किल्ले नारायणगडावर विद्यार्थ्यांकडून श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 01:26 AM2019-01-06T01:26:21+5:302019-01-06T01:27:06+5:30
स्वच्छतेचा संदेश : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्य
खोडद : समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज आॅफ इंजिनियरिंग बेल्हे व समर्थ कॉलेज आॅफ कॉम्प्युटर सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ भारत अभियान आणि सक्षम युवा समर्थ भारत या उपक्रमांतर्गत श्रमसंस्कार शिबिर सुरू आहे. शिबिरांतर्गत सुमारे १०० विद्यार्थ्यांनी खोडद जवळील किल्ले नारायणगडावर शनिवारी (दि.५) श्रमदान करून स्वच्छता केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना यांचाही या उपक्रमात सहभाग आहे. उपक्रमात मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना तालुका समन्वयक प्रा. सचिन शेळके यांनी स्वच्छता हीच निरोगी आणि समृद्ध जीवनाची पहिली पायरी असून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी हातात झाडू, खराटे, टिकाव, खोरी, कुदळ, घमेले, चुन्याचा रंग इ. प्रकारची साधनसामग्री बरोबर घेऊन पायथ्यापासून ते हस्तमाता मंदिरापर्यंत सर्व परिसर स्वच्छ केला.
संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके, समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनेश जाधव, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रशांत महाजन, प्रा. महेश खोसे, प्रा. संतोष खराबी, प्रा. मनीषा शेळके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नारायणगडावरील रस्त्याच्या दुतर्फा दगड आणि गोटे व्यवस्थितपणे रचून सांकेतिक चिन्हांचा दिशादर्शक म्हणून चुन्याने रंगवून चांगला वापर करण्यात आला. प्लॅस्टिकच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, अस्वच्छ कापडी वस्तू इ. चा निचरा केला. स्वच्छतेबरोबरच नैसर्गिक सौंदर्यांचा आस्वाद घेत विविध प्रकारच्या वनस्पतींची माहिती देखील विद्यार्थ्यांनी घेतली. पाण्याच्या टाक्यांमधील शेवाळ, गाळ, माती आणि आजूबाजूचे गवत काढून टाक्यांची स्वच्छता केली. दिशादर्शक फलक नीटनेटके करून योग्य त्या ठिकाणी पूर्ववत लावले. सुंदर परिसर हाच आमचा ध्यास आणि त्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू, अशी घोषणा देत गड, किल्ले ही राष्ट्राची संपत्ती जतन करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे यावेळी शिबिरार्थींनी सांगितले. नारायणगडाचा इतिहास आणि ऐतिहासिक ठेवा सर्वांनाच माहीत करून देण्यासाठी दरवर्षी या नारायणगडावर स्वच्छता मोहीम व प्लॅस्टिकमुक्त नारायणगड ही मोहीम राबवणार असल्याची माहिती कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनेश जाधव यांनी दिली.
नारायणगडावर सजीव सृष्टीचा खजिनाच
४सांबरकांड, गंधार, कडुनिंब, टाखळ, निलगिरी, सुबाभूळ, बोरी, लळई, धावडा, मोराई, पिठवणी, मोहाची झाडे, सीताफळ, आपटा, अंजन, आवळा, आंबा, बेहडा, चंदन, चिंच, हिरडा, जांभूळ, तरवड, रानझेंडू, अडुळसा, दंती, घाणेरी, कोरफड, हिंगनबेट, करवंद, बेल, कवठ, करावी, येलतुरा, वड, फ्र्रेरिया इंडिया त्याचप्रमाणे नारायणगडावरील प्रसिद्ध मानली जाणारी दुधकुडा ही वनस्पती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आढळते.
४येथील विविध प्रकारचे पक्षी, कीटक, फुले, फळे यांचा खजिनाच या नारायणगडावर आहे. काही अंशी विषारी आणि बिनविषारी सापदेखील या गडावर आढळून येतात. सर्व वनस्पती, पशु, पक्षी यांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.