श्रावण सोमवार : ज्योतिर्लिंग, ज्योतिबा देवाच्या उत्सव मूर्तींना नीरास्नान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:41 AM2018-08-14T00:41:27+5:302018-08-14T00:41:41+5:30
काटेबारस यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री ज्योतिर्लिंग आणि श्री जोतिबा देवाच्या उत्सव मुर्तींना श्रावणा निमित्त नीरा नदीच्या पवित्र तिर्थात सोमवारी स्नान घालण्यात आले.
नीरा - काटेबारस यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री ज्योतिर्लिंग आणि श्री जोतिबा देवाच्या उत्सव मुर्तींना श्रावणा निमित्त नीरा नदीच्या पवित्र तिर्थात सोमवारी स्नान घालण्यात आले. तिर्थक्षेत्राचा क दर्जा असलेल्या गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग मंदिरात श्रावण महिन्यातील समोवारसह दररोज शिवपींडीवर अभिषेक करण्यात येणार आहे.
कार्तिक महिन्यातील एकादशीला ज्योतिर्लिंग व जोतिबा देवाच्या मूर्तींना यात्रेनिमित्त व श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी नीरा नदीच्या तीर्थात स्नान घालण्याची परंपरा आहे. त्यानंतर महिनाभर मंदिरातील शिवपिंडीला अभिषेक घालण्याची परंपरा आहे. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास कर्नलवाडीतील जोतिबा देवाच्या मुर्तीची आरती झाल्यावर उत्सव मुर्ती पालखीतून मंदिर प्रदक्षिणे नंतर फुलांनी सजवलेल्या रथात ठेवण्यात आल्या.१०.३० च्या गुळुंचेच्या ज्योतिलींग मंदिरात आरती झाल्यावर उत्सव मुर्तीची पालखीतून मिरवणूक काढून त्या रथात ठेवण्यात आल्या. नीरा नदीच्या पैलतीरावरील दत्तघाटावर उत्सव मुर्तींना भक्तिभावाने स्नान घालण्यात आले. या स्नान सोहळ्यासाठी युवकांसह ज्येष्ठांनी गर्दी केली होती. प्रत्येक भाविकाला स्वहस्ते स्नान घालण्याची संधी असल्याने शिवभक्त या संधिचा वर्षातून किमान एकदा तरी लाभ घेतात. स्नानानंतर मुर्ती पुन्हा पालखीत ठेवल्यावर आरती झाली. त्यानंतर वैशिष्ट पुर्ण असा गुळ शेंगदाण्याचा प्रसाद भावीक एकमेकांना देत होते. नीरा स्नानानंतर दुपारी पालखी नीरेतील प्रसिद्ध वालचंद शहा पेढीच्या समोर दर्शनासाठी ठेवली होती. यावेळी परिसरातील शिवभक्तांनी श्रद्धेने दोन्ही मुर्त्यांचे दर्शन घेतले. साडेतीनच्या सुमारास हा सोहळा गुळुंचे कडे मार्गस्थ झाला.
श्रावण महिन्यातील सोमवारसह इतर दिवशी सकाळी ज्योतिर्लिंग मंदिरातील शिवपिंडीवर अभिषेक घालण्याची परंपरा आहे. युवकांसह जेष्ठ नागरिक श्रद्धेने अभिषेक घालतात. याचदरम्यान दर्शनासाठी इतर भाविक येतात त्यामुळे गर्दी होते. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. प्रत्येक शिवभक्ताला पिंडीवरच स्वहस्ते अभिषेक घालण्याची इच्छा असते. त्यामुळे यावर्षीपासून पूर्ण श्रावण महिन्यात दररोज सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत अभिषेक घातले जातील.
- गोरखभाऊ निगडे, अध्यक्ष ज्योतिर्लिंग मंदिर जीर्णोद्धार कमिटी.