बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मध्ये होणारी श्रावणी सोमवार यात्रा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 11:21 AM2021-08-09T11:21:06+5:302021-08-09T11:21:16+5:30

श्रावण महिन्यात भीमाशंकरकडे येऊ नये असे देवस्थानचे आवाहन

Shravan Monday Yatra at Shri Kshetra Bhimashankar, one of the twelve Jyotirlingas, canceled | बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मध्ये होणारी श्रावणी सोमवार यात्रा रद्द

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मध्ये होणारी श्रावणी सोमवार यात्रा रद्द

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनाकडून भीमाशंकर मध्ये गर्दी होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाणार

भीमाशंकर : राज्य सरकारने अजूनही धार्मिकस्थळे खुली करण्याची परवानगी दिली नसल्याने व  कोरोना व झिका व्हायरसचा संसर्ग विचारात घेता बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मध्ये होणारी श्रावणी सोमवार यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोणीही श्रावण महिन्यात भीमाशंकरकडे येऊ नये असे अवाहन देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.सुरेश कौदरे यांनी केले आहे. 

भीमाशंकर मधील श्रावण महिन्याची यात्रा पुरातन काळापासून सुरू आहे. श्रावण महिन्यात भीमाशंकरचे दर्शन पवित्र मानले जात असल्याने पुर्ण एक महिना दर्शनासाठी मोठया संख्येने भाविक येतात. या यात्रेचे नियोजन प्रशासन व भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट करत असते. यावर्षी दि.९ ऑगस्ट ते ७ सष्टेंबर दरम्यान श्रावण महिना येत असून यामध्ये ९, १६, २३, ३० ऑगस्ट व ६ सष्टेंबर असे पाच श्रावणी सोमवार आले आहेत.

मात्र कोरोनाची साथ अजूनही गेली नसल्याने व जिल्हयात झिका व्हायरचे रूग्ण मिळून आल्याने भीमाशंकर व परिसरातील पर्यटनस्थळांवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील धार्मिकस्थळे सुरू करण्याबाबत राज्य सरकारने अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे यावर्षी भीमाशंकर मधिल श्रावणी सोमवार यात्रा होणार नाही. 

कोरोना महामारी मुळे सुमारे एक वर्षापासून सर्व धार्मिकस्थळे बंद आहेत. श्रावण महिना म्हणजे आपल्या हिंदू संस्कृती मधील पवित्र महिना पण या संकटाच्या काळात भाविकांना भीमाशंकरच्या दर्शना पासून दूर रहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव अजूनही संपलेला नाही, तज्ञांनी तिस-या लाटेचे भाकित वर्तवले आहे तरी भाविकांनी देवस्थानला सहकार्य करून घरातून भगवान शंकराचा पुजा अराधाना करावी भीमाशंकर कडे येणे टाळावे व देवस्थानला सहकार्य करावे असे अवाहन कौदरे यांनी केले आहे.

श्रावण महिन्यात भीमाशंकर मध्ये गर्दी होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाणार 

श्रावण महिन्यात भीमाशंकरकडे भाविक व पर्यटक जाऊ नयेत यासाठी पालखेवाडी चेकपोस्ट, डिंभे नाका याठिकाणी चोविस तास कर्मचारी नेमले जाणार आहेत. श्रावण महिन्यात भीमाशंकर मध्ये गर्दी होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाणार आहे. कोणीही शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्या नुसार दंडात्मक कारवाई केली जाईल असे घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी सांगितले आहे. 

Web Title: Shravan Monday Yatra at Shri Kshetra Bhimashankar, one of the twelve Jyotirlingas, canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.