Shravan Month| एसटीचाही श्रावण; चला अष्टविनायकाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 12:33 PM2022-08-22T12:33:24+5:302022-08-22T12:38:41+5:30
श्रावणात एसटीचे उत्पन्न वाढले...
- अंबादास गवंडी
पिंपरी : कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काही काळ रुसलेली लालपरी दोन वर्षांनंतर सध्या सुसाट धावत आहे. त्यामुळे भाविक भक्तांना देवदर्शन करण्याची सोय झाली आहे. पुणेएसटी विभागातर्फे श्रावणानिमित्त भीमाशंकर व इतर प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांसाठी दर सोमवारी विशेष बस सोडण्यात येत आहेत. तर संकष्टी चतुर्थीला विशेष बस स्वारगेट तसेच पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारातून सोडली जाते. याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडत आहे.
अष्टविनायकसाठी विशेष गाडी
वल्लभनगर आगारातून प्रत्येक संकष्टी चतुर्थीला अष्टविनायक यात्रेचे आयोजन करण्यात येते. ही विशेष बस वल्लभनगरमधून सकाळी निघते. मोरगाव, सिद्धटेक, थेऊर, रांजणगाव येथे दर्शन घेऊन ओझर येते मुक्कामी थांबते. दुसऱ्या दिवशी लेण्याद्री, महड, पाली असा प्रवास करीत एसटी बस पुन्हा वल्लभनगर आगारात येते.
हवे तिथे करा दर्शन
फक्त श्रावणातच नाही, तर बाराही महिने हवे तेथे ग्रुप बुकिंग करून एसटी बस बुक करता येते. ४४ जणांचे ग्रुप बुकिंग झाले तर स्वतंत्र बस उपलब्ध करण्यात येते. यासाठी अगदी घरापासून ते इच्छित स्थळापर्यंत ही सेवा देण्यात येते.
श्रावणात एसटीचे उत्पन्न वाढले
श्रावण महिन्यात भाविक मोठ्या प्रमाणात धार्मिकस्थळी भेट देतात. त्यात गेल्या आठवड्यात सलग सुटी आल्यामुळे त्याचा फायदा एसटीला झाला. रक्षाबंधन काळात पुणे विभागातील सर्व गाड्या जास्तीत जास्त फेऱ्या करून राज्यात सगळ्यात जास्त उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडली.
भीमाशंकरला मोठा प्रतिसाद
एसटी महामंडळाकडून श्रावण महिन्यात विशेष बसेस सोडण्यात आल्या. पुणे विभागातून श्रावण महिन्याच्या दर शनिवारी, रविवारी आणि सोमवारी एसटीच्या ३० बस भीमाशंकरसाठी सोडण्यात येते. तसेच इतर दिवशी काही मोजक्या जादा गाड्या सोडण्यात येतात.
भक्तांना श्रावण महिन्यात देवदर्शन करता यावी यासाठी सर्व प्रमुख देवदर्शन स्थळी विशेष बसेस सोडण्यात येत आहेत, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वाढत्या महागाईने खासगी वाहनाने प्रवास करणे परवडत नाही. त्यात देवदर्शनासाठी तर खासगी वाहनचालक रक्कम आकारतात. यामुळे माफक दरात एसटीमुळे श्रावणात देवदर्शन झाले.
- सुभाष मोरे
एसटीचा प्रवास सामान्य लोकांसाठी हिताचे आहे. कोरोनामुळे दोन वर्षे कोठे जाता आले नाही. यावर्षी मात्र सारे सुरळीत असल्याने श्रावणात प्रवास करता आला.
-संजय वाघ