Bhimashankar: श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 08:32 PM2023-07-24T20:32:30+5:302023-07-24T20:33:15+5:30
यावेळी शिवलिंगावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती...
भीमाशंकर/तळेघर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्याच अधिक श्रावण सोमवारी सुमारे दोन लाख भाविकांनी ‘हर हर महादेव’, ‘जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय’ अशा घोषणा देत मुसळधार पाऊस व दाट धुक्यामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी शिवलिंगावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. दरवर्षी संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त येत असतात. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे निसर्गसौंदर्य फुलले असून जिकडे तिकडे धबधबे हे खळखळून वाहत आहेत. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी व पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन असा दुहेरी योग जुळून आला त्यामध्येच अधिक श्रावण महिन्याचा पहिला सोमवार त्या अगोदर दोन दिवस सुट्ट्या आल्यामुळे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे प्रचंड गर्दी पहावयास मिळाली. चौथा शनिवार, रविवार अशा दोन सुट्ट्या असल्यामुळे या दिवसांमध्ये गर्दीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला. या तीन दिवसांमध्ये सुमारे साडेचार ते पाच लाख भाविकांनी पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.
भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सौंदर्य फुलले आहे. यामुळे भीमाशंकरला येणारे भाविक पर्यटक हे डिंभे धरण, गोहे घाट, तसेच ठिकठिकाणी थांबून निसर्गाचा आनंद लुटत होते. वाहतुकीला सोपे व्हावे यासाठी प्रशासनाकडून पाच वाहनतळ ठेवण्यात आले होते. परंतु गर्दीचा ओघ बघता सर्व वाहने ही चौथ्या व पाचव्या थांब्याजवळ पार्क करण्यात आली होती. थांब्यापासून भाविकांना बसस्थानकापर्यंत सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या १४ मिनिबस व २० मोठ्या बस ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे भाविकांना फार वेळ थांबावे लागत नव्हते. शिवाजीनगर (पुणे) दर अर्ध्या तासाला जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या.
म्हातारबाचीवाडी येथे वनविभागाच्या चेकपोस्ट येथे करवसुलीसाठी वाहने थांबत असल्यामुळे सलग दोन दिवस येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागले. या ठिकाणी कर्मचारी संख्येत वाढ करावी अशीही मागणी येणाऱ्या भाविकांनी केली. तसेच मंचर भीमाशंकर रस्त्यावरील पालखेवाडीजवळील शनिमंदिर तसेच ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडल्यामुळे पहिल्याच अधिक श्रावण सोमवारी भाविकांना धक्केबुक्के खातच दर्शनाला जावे लागले.
शासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. खेड पोलिस उपविभागिय अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे व सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलिस निरीक्षक दहा सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक ४९ पोलिस कर्मचारी व ३३ होमगार्ड असा बंदोबस्त नेमण्यात आला होता. काही भाविकांनी आडवी तिडवी वाहने लावल्यामुळे भीमाशंकरपासून अलीकडे असणाऱ्या राजपूर, तळेघर, पोखरी डिंभा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पहावयास मिळाली. वाहतूक कोंडी काढता काढता मुसळधार पावसामध्ये पोलिस प्रशासनाची दमछाक होत होती.