श्रावणी सोमवार : हर हर शंभू महादेवा.. च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 07:46 PM2019-08-12T19:46:05+5:302019-08-12T20:02:32+5:30
दुस-या श्रावणी सोमवारी पुणे, मुंबई, नगर, नाशिक येथील भाविक मोठया संख्येने दर्शनासाठी आले होते..
भीमाशंकर - ओम नमः शिवाय.. हर हर महादेव... पंचामृत पूजा .. मंत्रघोष अशा मंगलमय वातावरणात श्री क्षेत्र भीमाशंकर श्रावणी सोमवार व सोमप्रदोष या महापर्वकाल प्रसंगी गजबजून गेले. या मुहूर्तावर राज्यभरातून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सोबत पावसाची संततधार, धुक्यांनी वेढलेला परिसर यामुळे भाविकांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव उमटले होते. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारी सुमारे दिड लाख भाविकांनी दर्शन घेतले. आज सुट्टी असल्याने जास्त गर्दी होती. तसेच पावसाचा जोर कमी झाल्याने मागील तीन दिवस मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे दर्शनरांग बसस्थानकापर्यंत म्हणजेच सुमारे दीड किलोमीटर लांबपर्यंत गेली होती.
हा आठवडा सुट्टयांचा असल्याने दररोज भीमाशंकरमध्ये गर्दी होणार आहे. तसेच भीमाशंकर मधील पाऊस देखील कमी झाला असून अधुनमधून पावसाच्या सरी पडत आहेत व धुक्याने संपुर्ण परिसर वेढलेला आहे. या दुसऱ्या श्रावणी सोमवारी पुणे, मुंबई, नगर, नाशिक कडिल लोक मोठया संख्येने दिसले. त्यात वाडा मार्गे भीमाशंकरचा रस्ता अजुनही सुरू झाला नसल्याने सर्व वाहतूक मंचर घोडेगाव भीमाशंकर मार्गे सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड गर्दी पहावयास मिळाली.
भीमाशंकरकडे येताना पोखरी घाटातून डिंभे धरणाचे विहंगम दृष्य दिसत असल्याने येथेही मोठया संख्येने पर्यटक थांबत आहेत. पोखरी घाटातील धबधब्यावर भिजण्याचा मनसोक्त आनंद पर्यटक घेतात. तर काही पर्यटक रस्त्याने आदिवासी लोक भात खाचरांमध्ये भात आवणी करत असताना थांबून भात लावण्याच्या कामात सहभागी होतात व फोटो काढण्याचा आनंद घेतात.
या गर्दिवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वहातुक कोंडी होवू नये म्हणून घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चार वाहनतळांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मंदिरातही भीमाशंकर देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी दर्शन लवकर व्हावे यासाठी नियोजनबध्द व्यवस्था केली होती.
.....
मागिल एक आठवडया पासून भीमाशंकर मध्ये लाईट सारखी ये जा करत असल्याने येथील व्यापारी व नागरिक त्रासले आहेत. अनेक वेळा विद्युत वितरण कंपनीचे शाखा अभियंता यांना सांगुनही याची कोणीही दखल घेत नाही. भीमाशंकर मध्ये यात्रे साठी हजारो भाविक रोज येत आहेत, तसेच येथे सतत धुके पसरलेले असते त्यामुळे लाईटची नितांत आवश्यकता आहे. यात्रा नियोजन बैठकीत विद्युत कंपनीच्या अधिका-यांच्या सर्व सांगुनही ते प्रत्यक्षात कोणतेही काम करत नाहीत अशी तक्रार भीमाशंकर देवस्थानचे विश्वस्त दत्तात्रय कौदरे यांनी केली आहे.
...........
बसस्थानका पासून मंदिरकडे येण्यासाठी नविनच सिमेंट काँक्रीटचा रस्ता झाला आहे. रस्ता करताना वन्यजिव विभागाने गटर काढू न दिल्याने सर्व पाणी रस्त्याच्या बाजुने व रस्त्यावरून वाहिले त्यामुळे रस्ता आतून पोखरला गेला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी हा रस्ता धोकादायक झाला आहे. पाऊस थांबल्या बरोबर हा रस्ता दुरूस्त केला जावा अशी मागणी भीमाशंकर ग्रामस्थांनी केली आहे.