वारीत भेटलेला श्रावणबाळ... जो घडवतोय अनेकांना पंढरीची वारी....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 09:27 PM2019-07-01T21:27:10+5:302019-07-01T21:34:38+5:30
वृद्ध मंडळीना वारीला जाण्याची कितीही इच्छा असली तरी ते जाऊ शकत नाहीत...
- तेजस टवलारकर-
वरवंड : पंढरीच्या वाटे सुख जिवा
आस ती भेटावया पांडुरंगा..! पांडुरंगावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक भक्ताची स्थिती याहून वेगळी ती काय असते.. परंतु वारीला पायी जाणे, पांडुरंगाचे दर्शन घेणे सगळ्यांना शक्य नसते. वृद्ध मंडळीना वारीला जाण्याची कितीही इच्छा असली तरी ते जाऊ शकत नाहीत. त्यातही हलाखीची परिस्थिती असेल तर वारी घडणे महाकठीण.. हवेली तालुक्यातील विठ्ठलभक्त फुलचंद गणपतराव कायगुडे या श्रावणबाळाने सुंदर युक्ती लढवत आपल्या आई वडिलांना काहीवर्षांपूर्वी पंढरीची वारी घडवली.. त्यानंतर फुलचंद यांनी ही वारीची परंपरा गेली सतरा वर्ष कायम ठेवली आहे..
पंढरीच्या विठू माऊलीला भक्तांची कणव आहेच.. त्याच्या दर्शनाची आस लागलेल्या आणि ध्यास घेतलेल्या एकाही भक्ताला तो अपूर्णात ठेवत नाही, हे सत्य वारकरी संप्रदाय जाणून आहे..अडचणींचा महापूर येऊन तो तुमची अतोनात परीक्षा पाहतो.. परंतु सरतेशेवटी तो भक्तांची नौका पंढरीच्या तीराला लावतो.. हवेली तालुक्यातील बकुरी गावच्या फुलचंद गणपतराव कायगुडे यांच्या आई वडिलांची यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नव्हती.. पण त्यांची पालखी सोहळा पाहण्याची व पांडुरंगाचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती. गाडी किंवा अन्य मार्गाने जाणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी घरी हातगाडा तयार करून त्यात आई वडिलांना बसवून पंढरपुरची वारी घडवली..या श्रावणबाळा
फुलचंद हे गेल्या सोळा वर्षांपासून वारी करत आहेत. ही त्यांची सतरावी वारी आहे. काही वर्षापूर्वी आई वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची भक्ती जागृत राहावी व वारीच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली देण्याचा निर्धार फुलचंद यांनी केला.
त्यांनी बहिणीला हातगाडीत बसवून वारी घडवली यावर्षी त्यांचा मोठा भाऊ राजेंद्र कायगुडे यांना हातगाडीत बसून वारीचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण करणार आहे. फुलचंद यांच्या हातगाड्यात दोन मेंढरं सुद्धा असतात...