राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी श्रीकृष्ण तरुण मंडळाची बाजी; १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली
By नम्रता फडणीस | Published: August 7, 2024 04:39 PM2024-08-07T16:39:13+5:302024-08-07T16:39:35+5:30
स्पर्धेत सहभागी झालेल्या १८५ मंडळांपैकी १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून, एकूण १२ लाख ६५ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२३ मध्ये पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने सलग दुस-या वर्षी प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या स्पर्धेत भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील श्री काळभैरवनाथ तरुण मंडळाने तृतीय, नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने चौथे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १८५ मंडळांपैकी १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून, एकूण १२ लाख ६५ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ रायकर, कार्याध्यक्ष यतीश रासने, संघटक मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. १० ) सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार असून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय माजी महापौर अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेच्या परीक्षण मंडळात डॉ.अ.ल.देशमुख, विजय चव्हाण, मधुकर जिनगरे, सुरेश वरगंटीवार, सतिश मराठे, किशोर सरपोतदार, चंद्रकांत निनाळे, बापू पोतदार, अविनाश कुलकर्णी, दिगंबर गायकवाड, संदीप शिंदे, विनायक भगत यांसह सहाय्यक म्हणून बाळू घाटे, अनिरुद्ध दोरगे, निखील कांबळे, गौरव दरेकर यांनी काम पाहिले.