Shree Ram Darshan: रेल्वेची रामायण ‘यात्रा’ पुण्यातून निघणार; प्रमुख व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 01:50 PM2021-10-07T13:50:37+5:302021-10-07T13:58:29+5:30
आयआरसीटीसी (indian railways catering corporation) व रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वदेश दर्शन’ या अंतर्गत देशातील प्रमुख शहरातून रामायण यात्रेचे आयोजन केले आहे.
पुणे : पुणेकरांना आता रामलल्लाचे व रामायणातील प्रमुख व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडणार आहे. आयआरसीटीसी (indian railways catering corporation) व रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वदेश दर्शन’ या अंतर्गत देशातील प्रमुख शहरातून रामायण यात्रेचे आयोजन केले आहे. यात प्रवाशांना अयोध्या, नंदीग्राम, सीतामढी, जनकपुरी, चित्रकूट, नाशिक, हंपी, रामेश्वरम आदी स्थळांना भेट देता येणार जाणार आहे. सात दिवसांच्या प्रवासानंतर यात्रेचा समारोप पुण्यात होणार आहे.
देशात पर्यटन वाढीस व विकासाला चालना मिळावी या हेतूने रेल्वे मंत्रालय व आयआरसीटीसी देशातल्या विविध भागातून यात्रेचे आयोजन करीत आहे. पुणे स्थानकावरून सुरू होणाऱ्या रामायण यात्रेचा कालावधी हा सात रात्र व आठ दिवसांचा असणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास ही विशेष गाडी निघेल. पहिल्यांदा अयोध्याला जाणार आहे.
तेथून रामायणातील प्रसिद्ध स्थळांना भेटी दिल्या जाणार आहे. प्रवाशांना एसी व व्दितीय शयनयान डब्यातून प्रवास करता येणार आहे. एका दिवसाच्या एसी डब्याचे तिकीट साधारणपणे १५०० रुपये असेल तर व्दितीय शयनयान डब्याचे ९०० रुपये तिकीट असणार आहे. या तिकीटदरातच प्रवाशांची राहण्याची, जेवण्याची, लोकल साईट सीन दाखविण्याची सोय आयआरसीटीसीकडून केली जाईल. तसेच प्रत्येक प्रवाशाला सेफ्टी किटदेखील दिले जाणार आहे.
प्रवाशांना आदी स्थानकांवरून सहभागी होता येईल
या स्थानकांवरून यात्रेत सहभागी होता येईल : रामायण यात्रा ही विशेष रेल्वे लोणावळा, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव आदी स्थानकावर थांबा घेणार आहे. त्यामुळे प्रवाशांना येथूनदेखील यात्रेत सहभागी होता येणार आहे.