माऊलींच्या संजीवन समाधीवर साकारला श्रींचा विठ्ठल अवतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 08:01 PM2018-04-18T20:01:37+5:302018-04-18T20:01:37+5:30
मंदिरात माऊलींच्या संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार, पूजासाहित्य, पुष्प सजावट करीत श्री विठ्ठल अवतारातील वैभवी रूप साकारले. श्रींचे मंदिरातील रूप पाहण्यास व श्रींचे दर्शनास भाविकांनी गर्दी केली.
आळंदी : श्री ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी मंदिरात प्रथा-परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यातील अक्षय तृतीयेनिमित्त श्रींना चंदन उटी लावण्यात आली. श्रींचे संजीवन समाधीवर चंदन उटीसह विविध वस्त्रालंकार वापरून श्रींचे विठ्ठल अवतार आकर्षक वैभवी रूप परिश्रमपूर्वक अभिजित धोंडफळे आणि देवस्थानचे सेवक पुजारी यांनी साकारले.
आळंदी देवस्थान व स्वकाम सेवा मंडळाने अक्षय तृतीयेनिमित्त चंदन उटीसह मंदिरात चैत्रगौरीपूजन उत्साहात केले. याप्रसंगी महिला भाविकांनी कारंजा मंडपात गर्दी करून दर्शन आणि हळदी-कुंकू घेतले. आळंदी मंदिरातील कारंजा मंडपात चैत्र गौरीपूजनानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती. चैत्र गौरीचे वैभवी रूप पाहण्यासह श्रींचे दर्शनास महिला, भाविक नागरिकांनी मंदिरात गर्दी केली. माऊली मंदिरातील प्रथा-परंपरांचे पालन करीत अक्षय तृतीयेनिमित्त प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या पूजा आणि भाविकांचे दर्शन, तसेच महिलांचा हळदी-कुंकू असे कार्यक्रम झाल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.
याप्रसंगी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, मालक बाळासाहेब आरफळकर, स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर, स्वकामसेवक आदी उपस्थित होते. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संजय रणदिवे, श्रीधर सरनाईक, सोमनाथ लवंगे, संजय लवांडे, महेश गोखले आदींनी संस्थानच्या प्रथेप्रमाणे मंदिरातील धार्मिक महत्त्व ओळखून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था ठेवली. वीणामंडपात वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवचनसेवा झाली. श्रींच्या मंदिरात अक्षय तृतीयेनिमित्त असणारी नित्य नैमित्तिक परिश्रमपूर्वक चंदन उटीचा वापर करून साकारण्यात आली.
गांधी परिवारातर्फे येथील नृसिंहसरस्वती स्वामी महाराज मठातदेखील चंदन उटीची परंपरा कायम आहे. गांधी येथील श्रीक्षेत्रोपाध्ये पुजारी आहेत. स्वामी महाराज मठात गांधी परिवाराने चंदन उटी साकारली. मंदिरात माऊलींच्या संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार, पूजासाहित्य, पुष्प सजावट करीत श्री विठ्ठल अवतारातील वैभवी रूप साकारले. श्रींचे मंदिरातील रूप पाहण्यास व श्रींचे दर्शनास भाविकांनी गर्दी केली.