सुवर्णपदक मिळवणारी श्रेया आणि तिच्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारे तिचे आईवडील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 04:46 PM2019-09-16T16:46:13+5:302019-09-16T17:02:48+5:30
पुण्याच्या श्रेया कंधारेने सुवर्णपद मिळवून देशाचे नाव तळपत ठेवले आहे. मात्र तिच्या यशामागे तिच्या आई वडिलांनी स्वतःच्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवून तिच्या खेळाकरिता आर्थिक लढाई लढवली आई.
पुणे : योगासने खरे तर भारतीय संकल्पना आहे. मात्र त्यातही काही बदल करून पाण्यात (ऍक्वा योगा) किंवा स्पोर्ट्स योगा, पॉवर योगा असे अनेक प्रकार विकसित होत आहे. मूळ योगासनांचा पाया असलेले विविध योगप्रकार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले असून पुण्याच्या श्रेया कंधारेने सुवर्णपद मिळवून देशाचे नाव तळपत ठेवले आहे. मात्र तिच्या यशामागे तिच्या आई वडिलांनी स्वतःच्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवून तिच्या खेळाकरिता आर्थिक लढाई लढवली.
श्रेयाने यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपद मिळवले असून आता तिने दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत इतिहास घडवला आहे. श्रेयाच्या यशामागची कहाणीही तितकीच प्रेरणादायी असून तिच्या यशात वडील शंकर व प्रशिक्षक चंद्रकांत पांगारे यांचा मोठा वाटा आहे. ती नंदा व शंकर कंधारे या दांपत्याची मुलगी. तिचे वडील रेल्वेत नोकरीला आहेत. ते स्वतः वडीलआंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असून सुरुवातीपासून मुलीने खेळाडू व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार सुरुवातीला तिने कबड्डीपासून सुरुवात केली. सुरुवातीला वडिलांप्रमाणे तिलाही कुस्तीची आस होती पण तिची हालचालीतील लवचिकता बघून तिचे प्रशिक्षक पांगारे यांनी तिचे कौशल्य ओळखले. त्यांनीच तिच्या वडिलांशी बोलून स्पोर्ट्स योगाचा पर्याय सांगितला आणि सुरु झाला नवा प्रवास.
सुरुवातीला आवडीसाठी योगासने करणारी श्रेया आता तासंतास फक्त सराव म्हणून करते. सकाळ संध्याकाळी मिळून सुमारे पाच तास ती सराव करते. तिच्यासाठी आई आणि वडिलांनीही इतर कोणत्याही गरजा पूर्ण न करता पहिले प्राधान्य खेळाला दिले आहे. त्याचेच फळ म्हणून आज ती आणि पार्थ (तिचा भाऊ) आंतराष्ट्रीय खेळाडू म्हणून विविध स्पर्धा गाजवत आहेत. याबाबत ती सांगते, 'घरात मला कधीही कशासाठी नाही म्हटले जात नाही. मी मुलगी आहे किंवा देशाबाहेर जायचे आहे अशा कोणत्याही गोष्टींसाठी आई वडिलांनी क्षणाचाही विचार न करता परवानगी दिली. माझ्या या यशामागे माझ्यापेक्षाही त्यांचा त्याग आणि प्रोत्साहन आहे'. वडील शंकर म्हणाले की, 'श्रेया अतिशय मनापासून योगासोबत एकरूप झाली आहे. तिला आमच्याकडून कायम असेच प्रोत्साहन असेल. तिचे अशीच कामगिरी करून देशाचे नाव उज्वल करावे'.