श्री म्हाळसाकांत खंडोबा यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:12 AM2021-02-27T04:12:50+5:302021-02-27T04:12:50+5:30
२७ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत धामणी येथील श्री म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान यात्रेदरम्यान मंदिर सुरू राहणार असल्यामुळे आंबेगाव, ...
२७ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत धामणी येथील श्री म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान यात्रेदरम्यान मंदिर सुरू राहणार असल्यामुळे आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यांतून तसेच पुणे-मुंबई इतर शहरातून बाहेरगावचे असलेले भाविक या ठिकाणी यात्रेदरम्यान येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दि. २७ पासून २८ फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजेपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या यात्रेदरम्यान श्री म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान यात्रेचे आयोजन करता येणार नसून यात्रेत फक्त प्रतीकात्मक स्वरूपातील पूजाअर्चा व धार्मिक विधी करणारे संबंधित व्यक्तीव्यतिरिक्त अन्य भाविकांना या दरम्यान या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. या ठिकाणी गावातील व बाहेरील गावाहून आलेल्या कोणत्याही व्यक्तींना हॉटेल स्टॉल व खाऊचे दुकाने इतर अस्थापना लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणूक पालख्या, काठी मिरवणूक काढता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे. भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी केले आहे.