चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे श्री मोरया गोसावी समाधी सोहळा २७ नोव्हेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 05:03 PM2017-11-25T17:03:27+5:302017-11-25T17:08:50+5:30
श्री मोरया गोसावी यांचा ४५६ वा समाधी महोत्सव २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
चिंचवड : श्री मोरया गोसावी यांचा ४५६ वा समाधी महोत्सव २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर व कलाकार हे या वर्षीचे मुख्य आकर्षण असणार असल्याची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्थ मंदार देव महाराज यांनी शनिवारी दिली.
मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात गायिका राधा मंगेशकर, जितेंद्र अभ्यंकर, आनंद भाटे, तौफिक कुरेशी हे कलाकार या वर्षीच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहेत. सांगलीमधील संभाजी भिडे गुरुजी यांना करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते या वर्षीचा श्री मोरया जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मोरया गोसावी समाधी मंदीर परिसरातील 'देऊळमळा' या पटांगणात या महोत्सवाचे आयोजन होणार आहे. या पत्रकार परिषदेस विश्वस्थ विश्राम देव, आनंद देव, राजेंद्र उमाप, विनोद पवार, नगरसेविका आश्विनी चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, होम हवन, आरोग्य शिबिरे, प्रवचन, भजन व मराठी सुगम संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या दरम्यान सायंकाळी पाच ते सात या वेळेत ह. भ. प. चारुदत्त आफळे यांचे 'दत्त संप्रदाय व गुरु-शिष्य परंपरा यावर प्रवचन होणार आहे.
५ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता मोरया गोसावी यांच्या समाधीची महापूजा, नऊ वाजता गणेशयाग, दुपारी आरोग्य शिबिर, सायंकाळी पाच वाजता अपर्णा रामतीर्थकर यांचे 'नाती जपुया' या विषयी व्याख्यान, रात्री साडेआठ वाजता 'मोगरा फुलला' हा संगीत कार्यक्रम सादर होणार आहे.
६ डिसेंबरला सकाळी सात वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, महाभिषेक नऊ वाजता श्री दत्तयाग व साडेनऊला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी अपर्णा रामतीर्थकर यांचे व्याख्यान व रात्री आठ वाजता आनंद भाटे यांचा 'आनंदरंग' हा कार्यक्रम होणार आहे.
७ तारखेला सकाळी गोंदवलेकर महाराज आरती मंडळाची काकड आरती होणार आहे. नऊ वाजता महिलांचे सामुदायिक श्री सूक्त पठण व कुंकुमार्जन नऊ वाजता दत्तयाग, नेत्र चिकित्सा शिबिर व माफक दरात चष्मे वाटप, सायंकाळी साडेपाच वाजता संभाजी भिडे गुरुजी यांचे 'भगवान श्री छत्रपती आणि आपण' या विषयावर व्याख्यान नंतर जीवन गौरव पुरस्कार साडेआठ वाजता तौफिक कुरेशी यांचे जंबे वादन व तन्मय देवचक्के यांचे हार्मोनियम वादन होणार आहे.
८ तारखेला मोरया गोसावी यांच्या समाधी दिवशी पहाटे साडेचार वाजता मंदार देव महाराज व चिंचवड ब्राम्हवृंद यांच्या हस्ते समाधीची महापूजा व अभिषेक व नंतर भव्य दिंडी व समाधी मंदीरावर पुष्पवृष्टी करण्यात येईल. साडेदहा वाजता हभप प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याचे कीर्तन व १२ वाजल्यापासून भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य कार्यक्रम
* सोमवार (२७ नोव्हेंबर) ते शुक्रवार (८ डिसेंबर) सकाळी आठ ते नऊ सतीश कुलकर्णी हे श्री मोरया गोसावी चरित्र पठण करणार आहेत
* २७ ते ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते१२ व सायंकाळी ५ ते ७ गुरुचरित्र पठण
* संपूर्ण महोत्सव दरम्यान १ ते ४ या वेळेत विविध भजनी मंडळांचे भजन सादरीकरण होणार आहे.
* २८ व २९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते ९ हभप नारायण श्रीपाद काणे यांचे कीर्तन होणार आहे.
* ३० नोंव्हेंबर रात्री ८ ते ९ तानसेन संगीत विद्यालय सुगम संगीत सादरीकरण
* १ डिसेंबर रात्री ८ ला डॉ. जयंत करंदीकर यांचे गुरुमहात्म्य या विषयी प्रवचन
* २ व ३ डिसेंबर रात्री ८ ला प्रणव देव यांचे श्री मोरया गोसावी या विषयावर कीर्तन
* ४ डिसेंबर पहाटे साडेसहा वाजता उचगावकर सर यांचे योगासन वर्ग, विनोद व जयश्री कुलकर्णी हे 'आठवणीतील गाणी' सादर करतील. रात्री सात वाजता जागृती कला मंच 'उगवला चंद्र पुनवेला' हा नृत्याचा कार्यक्रम सादर करतील.