सासवडमध्ये टाळ - मृदंगाचा गजर अन् हरिनामाच्या जयघोषात श्री संत सोपानकाका पालखी प्रस्थान सोहळा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 02:27 PM2021-07-07T14:27:34+5:302021-07-07T14:27:42+5:30
मुख्य पालखी सोहळा दि.१९ जूलैला एस. टी ने मर्यादित वैष्णवांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार
सासवड: "अवघेची त्रलोक्य आनंदाचे आता,चरणी जगन्नाथा चित्त ठेले" हा भाव मनी धरून संत श्री सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याने मंगळवारी पंढरपूरकडे प्रतिकात्मक प्रस्थान ठेवले. मुख्य पालखी सोहळा १९ जूलैला एस. टी ने मर्यादित वैष्णवांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित वैष्णवांच्या ऊपस्थितीत क-हा तीरावर टाळ, मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करत प्रतिकात्मक पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. या पालखी सोहळ्यास पावसाने हजेरी लावल्याने वैष्णवांमध्ये ऊत्साह होता.
सोपानदेवांच्या पालखीचा प्रस्थानाच्या दिवशी मंदिरात पहाटेपासून काकड आरती, महापूजा व धार्मिक विधी झाले. दुपारी ४ नंतर प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर सर्व दिंडीप्रमुखांचे मानाचे अभंग झाले. याचदरम्यान देवस्थानप्रमुख गोपाळ गोसावी यांच्या देवघरातील संत सोपानदेवांचे पादुकांना सुवासिंनीनी औक्षण केले.
तद्नंतर मानकरी अण्णासाहेब केंजळे महाराज, गोपाळ गोसावी, हिरूकाका गोसावी सोहळाप्रमुख अॅड.त्रिगुण महाराज गोसावी व गोपाळ महाराज गोसावी यांनी देवघरातून सोपानकाकांच्या पादुका आणून वीणामंडपातील पालखीमध्ये विधिवत स्थानपन्न केल्या. सोपानदेव देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने पंढरपूर देवस्थान, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई देवस्थान,संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, व दिंडीप्रमुखांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला.