'ज्ञानोबा माऊली' 'तुकाराम' असा जयघोषात श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रात्री उशीरा देहूत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 11:12 AM2021-07-25T11:12:18+5:302021-07-25T11:14:06+5:30
Sant Tukaram Maharaj's Palkhi Sohala: पंढरपूर येथे महाकाल्या व महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 2 वाजता श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पाच दिवसांच्या मुक्कामानंतर देहूकडे परतीच्या प्रवासाला निघाल्या.
देहूगाव - 'ज्ञानोबा माऊली' 'तुकाराम' असा जयघोष करीत, फुलांची उधळण करीत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा 336 वा आषाढीवारी पालखी सोहळा श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका शासकीय शिवशाही बसने शनिवार(ता.24 जुलै) रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास श्री क्षेत्र देहूगाव येथे दाखल झाला व रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मंदिर प्रदक्षिणा घालुन श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका मंदिराच्या भजनीमंडपात विसावल्या.
तत्पुर्वी पंढरपूर येथे महाकाल्या व महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 2 वाजता श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पाच दिवसांच्या मुक्कामानंतर देहूकडे परतीच्या प्रवासाला निघाल्या. रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराल चिंचोली येथे पादुका स्थानावर अभंग आरती झाली. रात्री 11.15 च्या सुमारास श्री क्षेत्र देहूगाव येथील प्रवेशद्वार कमानीत दाखल होताच उपस्थित भाविक व ग्रामस्थांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम नामाचा जयघोष करीत पादुकांचे स्वागत केले. मात्र यावेळी नगरपंचायत प्रशासनाचे कोणीही प्रतिनीधी उपस्थित नव्हते. पालखी मार्गावर माळीनगर येथे भाविकांनी व ग्रामस्थांनी पादुकांसह आलेल्या बसवर फुले उधळून पादुकांचे स्वागत केले. श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन येणारी बस प्रवेशद्वार कमानीमध्ये गाववेशीत येताच परंपरेप्रमाणे पादुकांच्या पालखी सोहळ्याला रामचंद्र तुपे व त्यांच्या पत्नी यांनी दहीभाताचा नैवद्य दाखविला. येथे पालखी सोहळा प्रमुख अजित महाराज मोरे यांनी डोक्यावर घेतल्या.
श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपूरला गेलेले पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्थ माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे सेवकरी हे पादुकासह खाली उतरले व येथून उपस्थित भाविकांनी टाळ मृदंगाच्या गजरात मंदिराकडे निघाल्या. यावेळी भाविकांनी व ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहुन पादुकांचे जोरदार स्वागत केले. पादुका गावातील हनुमान मंदिराच्या समोर येताच अभंग घेण्यात आला. टाळ मृदंगाच्या तालावर अभंग म्हणत मंदिराकडे पादुका नेण्यात आल्या. गावात पालखी मार्गावर रांगोळींच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
पादुका इनामदार वाड्यासमोर आल्यानंतर अभंग आरती झाली. तेथून महाराजांच्या पादुका सोहळा प्रमुख व विश्वस्थांनी डोक्यावर घेत मंदिराच्या महाद्वारात आणण्यात आल्या. मंदिराच्या महाद्वारात अभंगाचे गायन झाले व पादुका मंदिराच्या महाद्वारातून रात्री 11.30 वाजता मंदिराच्या आवारात नेण्यात आल्या. मंदिराच्या आवारात गेल्या नंतर भजन म्हणत पाऊले खेळत टाळमृदंगाच्या गजरात प्रदक्षिणा घालण्यात आली. रात्री 12 वाजता पादुका भजनी मंडपात आल्यानंतर आरती झाली व पादुकां भजनी मंडपात पुढील 10 दिवसांसाठी विसावल्या. नियमित श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास हा 10 दिवसांचा असतो. यंदा मात्र हा प्रवास केवळ दहा तासांत संपला. तर जाताना 19 दिवसांचा पायीवारी सोहळा एक दिवसांचा होवून पंढरपूर मध्ये मात्र यंदा पाच दिवस पालखी सोहळा मुक्कामी होता. कोवीडचा प्रभाव असूनही यंदा शासनाने पालखी सोहळा पंढरपूर मध्ये पाच दिवस मुक्कामाला परवानगी दिली होती.
पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी भाविकांनी गर्दी करू नये यासाठी देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विलास सोंडे, प्रसाद गज्जेवार यांच्यासह बंदोबस्तासाठी उपस्थित होते. तळवडे वहातुक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी काही वेळ वहातूक बाह्यवळण मार्गाने वळविली होती.वाटेत शिवशाही बसची वातानुकुलीत यंत्रणा बिघडल्याने हा पादुका पालखी सोहळा देहूत पोहचण्यासाठी तब्बल तीन तास उशीर झाली. पंढरपूर सोडल्यानंतर पादुकांसमवेत असलेल्या दुसऱ्या बसमधील वातानुकुलीत यंत्रणा नादुरुस्त झाली. त्यामुळे बसमधील वारकऱय़ांना गरम होवू लागले. या बसला बंदिस्त काचा असल्याने बसमध्ये हवा येण्यास जागा नव्हती. त्यामुळे आतील वारकरी घामाघुम झाले. ही बाब लक्षात आल्यानंतर वाटेत अकलुज येथे या बसची वातानुकुलीत यंत्रणा दुरूस्त करून घेण्यात आली. त्यामुळे हा पालखी सोहळा देहूत पोहचण्यासाठी रात्री उशीर झाला असल्याचे समजले.