श्रीधर माडगूळकरांना भावपूर्ण निरोप, दिग्गजांची श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 02:49 AM2019-02-22T02:49:48+5:302019-02-22T02:50:14+5:30
पार्थिवावर अंत्यसंस्कार : विविध क्षेत्रांतील मान्यवरांची श्रद्धांजली
पुणे : कॉँग्रेसचा कार्यकर्ता, उत्तम कवी, लेखक, सच्चा मित्र अशी राजकारण व साहित्य क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे ग. दि माडगूळकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्रीधर माडगूळकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षातच त्यांच्या चिरंजीवाचे निघून जाणे अनेकांच्या मनाला चटका लावून गेले.
वैकुंठ स्मशानभूमीमध्ये कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, डॉ. सतीश देसाई, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते अंकुश छाजेड, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, उद्धव कानडे, जयराम देसाई, वि. दा. पिंगळे, प्रकाशक अनिल कुलकर्णी आदी मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अण्णांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्यावर आलेल्या लेखांचे संकलन करून एक पुस्तक प्रकाशित करण्याचा संकल्प त्यांनी केला होता. त्याचे काम अंतिम टप्प्यात होते. मात्र हे काम त्यांना पूर्ण करता आले नाही. याबाबत मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली.
मी महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. तेव्हा चळवळीत आम्ही एकत्र काम करायचो. आम्ही संघटना उत्तम बांधली. अण्णांच्या घरी पंचवटीला जाणे व्हायचे. अण्णांमुळे अनेक साहित्यिकांचा सहवास लाभला. सर्वांना आपुलकीने अण्णा सांभाळायचे. श्रीधरला साहित्य, राजकारण याची उत्तम जाण होती. त्यांना १९८० व १९८५ ला आमदारकीचे तिकीट मिळाले; पण दुर्दैवाने त्यांचा निसटता पराभव झाला. गदिमा जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्यावर आलेले लेख संकलित करण्याचा संकल्प होता. त्याचे काम अंतिम टप्प्यात होते; मात्र ते पूर्ण करता आले नाही.
- उल्हास पवार, ज्येष्ठ कॉँग्रेस नेते
सिद्धहस्त कवी श्रीधर माडगूळकर यांना लहानपणापासूनच साहित्याची आवड होती. फर्ग्युसनमध्ये असताना ‘साहित्यसरकार’ नावाचे भित्तीपत्रकाचे ते लेखन करायचे. त्यानंतर ते लेखन करीतच राहिले. त्यांनी ‘जिप्सी’ नावाचे मासिक काढून अनेकांना लिहिते केले. याशिवाय अनेक वृत्तपत्रांत स्तंभलेखन केले. त्यांच्याकडे वडिलांबद्दलच्या खूप आठवणी होत्या. गदिमांचे स्मारक व्हावे यासाठी त्यांनी अनेक वर्षे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन महापालिकेने स्मारकासाठी जागा दिली आहे. त्यांना स्वरानंद व गदिमा प्रतिष्ठानकडून मनापासून श्रद्धांजली.
- प्रकाश भोंडे, स्वरानंद प्रतिष्ठान
श्रीधर व मी १९७० सालापासून मित्र आहोत. तो बीएमसीसी तर मी फर्ग्युसनमध्ये होतो. अण्णांच्या आठवणी हाच आमचा गप्पांचा विषय असायचा. मी गदिमांवर ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ हा कार्यक्रम केला तेव्हा त्याने अण्णांची भेट घडविली होती. अण्णांची जन्मशताब्दी साजरी करण्यासंदर्भात अनेकदा आमच्या चर्चा घडायच्या. त्याला राजकारणातही खूप रस होता. त्याच्या निधनाने आमचा सन्मित्र गेला.
- सुधीर गाडगीळ, निवेदक
वडिलांची किर्ती, योगदान, मराठी वाङ्मय क्षेत्रातील स्थान लक्षात घेऊन हा वारसा जबाबदारीने पुढे नेणाऱ्यांपैैकी एक म्हणजे श्रीधर माडगूळकर. त्यांचा स्वभाव अत्यंत सौैम्य व सात्त्विक होता. त्यांना वडिलांच्या मोठेपणाची पुरेपूर जाण होती. गदिमा यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांचे स्मारक व्हावे, यासाठी ते मनापासून धडपड करत होते. त्यांच्या या धडपडीला यश यावे, अशी प्रत्येकाची मनापासूनची इच्छा होती.
- डॉ. अरुणा ढेरे, संमेलनाध्यक्षा
श्रीधर हा ज्येष्ठ भाऊ नव्हे तर चांगला मित्र होता. उत्तम साहित्यिक होता. राजकारण क्रीडा सर्वांमध्ये रस घेणारा खेळकर व्यक्तिमत्त्वाचा भाऊ गेला याचे दु:ख होत आहे.
- आनंद माडगूळकर, बंधू
वडील बंधू हा वडिलांसारखाच असतो. तो आमचा आधार होता. तोच आज हरपला. तो उत्तम कवी होता; पण काव्यक्षेत्रात त्याने फारसे लेखन केले नाही, याची खंत वाटते.
- शरत्कुमार माडगूळकर, बंधू
श्रीधर माडगूळकर यांनी गदिमांचा वारसा सक्रियपणे पुढे चालवला. राजकारणात त्यांना रस होता. मंतरलेल्या आठवणी, आठी आठी चौसष्ट आणि अजून गदिमा ही त्यांची पुस्तके गाजली. गदिमा स्मारकासाठी तब्बल ४० वर्षे ते प्रयत्नशील होते. गदिमा जन्मशताब्दी वर्षात त्यांचे जाणे हे अत्यंत वेदनादायी आहे. पण गदिमांचे स्मारक आम्ही नक्की पूर्ण करू.
- सुमित्र माडगूळकर, चिरंजीव
श्रीधर हे गदिमांच्या सुवर्णयुगाचे जवळचे साक्षीदार होते. ते उत्तम लेखक व साहित्याचे जाणकार होते. गदिमांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक सुंदर कार्यक्रम केले, त्याला तोड नाही. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य रसिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गदिमांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी कार्यक्रमांचे उत्तम नियोजन केले होते. गदिमा स्मारकासाठी ते खूप झटत होते. स्मारक दृष्टिक्षेपात असताना व वडिलांच्या जन्मशताब्दी वर्षातच श्रीधर माडगूळकर यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. साहित्य परिषदेशी त्यांचा जवळचा स्नेह होता. जन्मशताब्दीनिमित्त मसापमध्ये रंगलेली ‘पुत्र सांगाती’ ही मैफल संस्मरणीय ठरली.
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद