संगीत ही आयुष्यभर शिकण्याची कला - श्रीकांत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 02:13 AM2018-06-16T02:13:52+5:302018-06-16T02:13:52+5:30
पूर्वीची संगीत शिक्षणाची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. ताल, सूर, लय पक्के झाले पाहिजेत, असा दंडक असायचा. कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. ही कला जिद्दीने आणि संयमाने आत्मसात करणे आवश्यक असते, असे मत संगीत विद्यालयाचे प्रमुख श्रीकांत देसाई यांनी व्यक्त केले.
गोपाळ गायन समाज संगीत विद्यालयाचा १०० वर्षे संगीताच्या शिक्षणाचा यज्ञ अविरतपणे सुरू आहे. गोविंदराव देसाई यांनी विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. संगीताचा पाया भक्कम करण्याचे काम संगीत विद्यालयाने केले. पूर्वीची संगीत शिक्षणाची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. ताल, सूर, लय पक्के झाले पाहिजेत, असा दंडक असायचा. कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. ही कला जिद्दीने आणि संयमाने आत्मसात करणे आवश्यक असते, असे मत संगीत विद्यालयाचे प्रमुख श्रीकांत देसाई यांनी व्यक्त केले.
गोपाळ गायन समाज संगीत विद्यालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ६० पानांच्या या स्मरणिकेमध्ये संगीत विद्यालयाचा प्रवास, वाटचाल, इतिहास, माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मनोगतपर लेख आदींचा समावेश असेल. ‘स्वरानुबंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन २ जुलै रोजी महापौर मुक्ता टिळक आणि गायक पंडित डॉ. अजय पोहनकर यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती संस्थेचे प्रमुख आणि विश्वस्त श्रीकांत देसाई यांनी दिली.
एक जुलै रोजी गोपाळ गायन समाज संगीत विद्यालयाला १०० वर्षे पूर्ण होत असून, विद्यालय १०१व्या वर्षात पदार्पण करील. १ जुलै १९१८ रोजी गुरुवर्य गोविंदराव देसाई यांनी वाड्यातील एका खोलीमध्ये गोपाळ गायन समाज संगीत विद्यालय सुरू केले. सहा-सात वर्षांनी लोकमान्य टिळक, न. चिं. केळकर यांच्या साह्याने गोविंदराव देसाई यांना टिळक स्मारक मंदिराजवळ छोटी जागा मिळाली. १९२६मध्ये इमारतीचे काम सुरू झाले. दोन एप्रिल १९२७ रोजी गोविंदराव देसाई यांचे गुरू विष्णू दिगंबर पलूसकर यांच्या गायनाची मैफल रंगली आणि इमारतीचे उद्घाटन झाले. तेव्हापासून १०० वर्षे संगीताच्या शिक्षणाचा यज्ञ अविरतपणे सुरू आहे. संगीताच्या पाया भक्कम करण्याचे काम संगीत विद्यालयाने केले. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी येथे संगीताचे धडे गिरवले. २० मे हा गोविंदराव देसाई यांचा स्मृतिदिन. यानिमित्त त्यांच्या सहा शिष्यांनी गायनातून गुरूंना मानवंदना दिली. या सर्व विद्यार्थिनी ७० वर्षे वयोगटातील होत्या. सर्वांत वृद्ध विद्यार्थिनी असलेल्या आजी ९३ वर्षांच्या आहेत. गोविंदराव देसार्इंनी शिकविलेल्या चीजा इतक्या वर्षांनंतरही त्यांनी जशाच्या तशा सादर केल्या.
पूर्वीची संगीत शिक्षणाची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. ताल, सूर, लय पक्के झाले पाहिजेत, असा दंडक असायचा. संगीत हे केवळ शिक्षण न उरता ती साधना व्हायची. दररोज नियमितपणे गुरू-शिष्यांचा संवाद, अध्ययन-अध्यापन होत असे. विद्यार्थी एकाग्रतेने आणि संयमाने संगीत शिक्षणाकडे पाहत असत. त्या वेळचे शिक्षकही कडक शिस्तीचे होते. आता संगीताचे क्लास आठवड्यातून एकदा-दोनदा होतात. विद्यार्थ्यांमधील प्रामाणिकपणा, झोकून देण्याची तयारी, संयम, कष्ट करण्याची तयारी कमी झाल्यासारखे वाटते. कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. सुरुवातीपासूनच आपल्याला हे जमेल की नाही, अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात असते. सुरुवातीला काहीसे प्रयत्न केले जातात. शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोजकीच आहे. करिअर म्हणून संगीतक्षेत्राकडे पाहिले जाते की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. कला साध्य करणे हे स्वत:वर अवलंबून असते. जिद्दीने शिकण्याची तयारी आणि साधनेला संगीतक्षेत्रात पर्याय नाही. त्यामुळेच ही कला जिद्दीने आणि संयमाने आत्मसात करणे आवश्यक आहे. सध्याच्या पिढीसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत; त्यामुळे त्यांचे आयुष्यही वेगवान झाले आहे. अशा वेळी सलग १०-१२ वर्षे संगीत साधना करण्याचा संयम कितपत टिकू शकतो, हे पाहावे लागते. किमान १० वर्षे शिकल्यावर संगीतातील मूलभूत गोष्टींचे ज्ञान अवगत होते. संगीत ही आयुष्यभर शिकावी लागणारी कला आहे. बदलत्या काळात विद्यार्थ्यांचे प्राधान्यक्रम बदलल्याने त्यांच्यामध्ये संयम राहिलेला नाही. साधनेपेक्षा सादरीकरण, मंचावरील कार्यक्रम यांवर भर दिला जातो. मुलांमध्ये रिअॅलिटी शोचे आकर्षण वाढले आहे. या बदलत्या काळात पालकांनीही संयम राखणे आवश्यक आहे. त्यांचीही मानसिकता बदलायला हवी. तरच, संगीताचा आत्मिक आनंद घेता येईल.