"ठाकरे सरकारने फक्त घोषणा केल्या, सध्या काम करणारे सरकार सत्तेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 09:32 AM2022-12-05T09:32:20+5:302022-12-05T09:35:30+5:30
पक्षाच्या जाहीर मेळाव्यात ते बाेलत हाेते...
पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकार केवळ घोषणा करणारे होते; पण गेल्या पाच महिन्यांत आलेले शिंदे-फडणवीस सरकार काम करणारे आहे, असे मत बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. पक्षाच्या जाहीर मेळाव्यात ते बाेलत हाेते.
विधानसभा प्रतोद भरत गोगावले, प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शहर प्रमुख नाना भानगिरे, सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, किरण साळी, लीना पानसरे आदी उपस्थित होते. यावेळी अनेकांना पक्षप्रवेश देण्यात आला.
डाॅ.शिंदे म्हणाले की, नेतृत्वावर विश्वास राहिला नाही, म्हणून उठाव झाला. सामान्य शिवसैनिकांची भेट होणे सोडाच, ते मंत्री, आमदार, खासदार यांना भेटायचे नाहीत. अडीच वर्षे मुख्यमंत्री असून, शिवसैनिक काय यातना भोगत होते, हे पाहायला त्यांना वेळ नव्हता. म्हणून सत्तेला लाथ मारून ५० आमदार आणि १३ खासदार बाहेर पडले. सर्वसामान्य घरातील मुख्यमंत्री झाला आणि वर्षाबंगल्याची दारे सर्वसामान्यांसाठी खुली झाली.
दरम्यान, पुण्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे बैठक आयोजित करावी, अशी मागणी नाना भानगिरे यांनी आपल्या भाषणातून केली. त्याचा उल्लेख करून डॉ.शिंदे यांनी रिंग रोडसाठी १० हजार ५०० कोटी मंजूर केले असून, अन्य प्रश्नही सोडविण्यात येतील, असे सांगितले.
डाॅ.श्रीकांत शिंदे म्हणाले...
- भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या विधानाबद्दल विचारले असता, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही अपशब्द काढून नये. बोलताना भान ठेवावे.
- दररोज सकाळी भोंगा वाजतो. खंजीर, खोके, गद्दार हेच शब्द त्यातून बाहेर पडतात, परंतु पूर्वी हे खोके कोणाकडे जायचे, पैसे कोण मोजायचे, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. आता ते खोके बंद झाले, म्हणून ओरड सुरू झाली आहे.
- लाल महाल येथील लाइट ॲण्ड साउंड शो सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.