श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ओंकार महालात विराजमान

By श्रीकिशन काळे | Published: September 19, 2023 06:02 PM2023-09-19T18:02:11+5:302023-09-19T18:02:38+5:30

पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत प्रतिष्ठापना...

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Bappa Omkar is seated in the palace | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ओंकार महालात विराजमान

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा ओंकार महालात विराजमान

googlenewsNext

पुणे : बाप्पा मोरया रे...बाप्पा मोरया रे...च्या गजरात आणि ढोल-ताशाच्या निनादात पारंपरिक पध्दतीने सजवलेल्या रथामधून हिंदुस्तानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या गणरायाचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. सोबतीला मर्दानी खेळ आणि शंख नादाने भाविक मंत्रमुग्ध झाले. गणरायाची विधीवत पूजा पं. विजय घाटे यांनी सपत्नीक यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर बाप्पाची प्रतिष्ठापना ओंकार महालात झाली.

सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातून रथातून बाप्पाच्या जंगी मिरवणुकीस सुरुवात झाली. रथासमोर पारंपरिक पांढऱ्या शुभ्र टोप्या परिधान केलेले श्रीराम पथक, अस्सल पुणेरी पोशाखातील आणि दरवर्षी मिरवणुकांचे आकर्षण ठरणारे मराठी चित्रपट अभिनेत्यांचा सहभाग असलेले कलावंत पथक बाप्पाच्या समोर आपली कला सादर करत होते. त्यापुढे गजर पथक, केशव शंखनाद पथक या सर्व पथकांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक अप्पा बळवंत चौक मार्गे बाजीराव रस्त्याने शनिवार वाड्यापासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट येथे पोहोचली. या मिरवणुकीत असंख्य गणेशभक्त सहभागी झाले होते. दरम्यान, या मिरवणुकीचा थाट पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पुणेकर भाविकांनी गर्दी केली होती. यात तरुणाईचा मोठा उत्साह पहायला मिळाला. सेल्फी सोबतच कँडीड फोटो टिपण्यात तरुणाई गर्क झाली होती.

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बाप्पाचे ओंकार महालात आगमन झाले. त्यानंतर ज्येष्ठ तबला वादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन व जान्हवी धारिवाल-बालन, ट्रस्टचे अन्य विश्वस्त व पदाधिकारी आणि अनेक गणेशभक्त उपस्थित होते. पुढील दहा दिवस आमच्या ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी दिली. तसेच गणेश भक्तांसाठी आरोग्य शिबीराचेही आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदुस्थानातील पहिल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना पंडित विजय घाटे यांच्या हस्ते झाली. यावेळी आम्ही सर्वांनी देशभरातील दुष्काळाचे सावट दूर होऊन सर्वत्र भरपूर पाऊस पडावा, बळीराजा सुखी व्हावा आणि सगळीकडे सुख, समृद्धी आणि शांतता नांदावी, अशी प्रार्थना श्री बाप्पाच्या चरणी केली.

- पुनीत बालन, विश्वस्त आणि उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

आज माझ्या हस्ते हिंदुस्थानातील पहिल्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झाली, हे मी माझे भाग्य समजतो. सर्वांना सुखी ठेवावे, अशी प्रार्थना मी बाप्पा चरणी केली आहे.
- पद्मश्री विजय घाटे, तबला वादक

Web Title: Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Bappa Omkar is seated in the palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.