'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट'कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल; विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 09:59 PM2023-09-17T21:59:52+5:302023-09-17T22:05:17+5:30
Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust : सुप्रसिध्द तबलावादक पद्मश्री श्री. विजय घाटे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना...!
पुणे - हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट' च्यावतीने यंदा गणेशोत्सवात विविध पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात महिला आणि विद्यार्थ्यांच्या अथर्वशीर्ष पठणापासून तर रिल स्पर्धा आणि आरोग्य शिबिर, नेत्रदान शिबिर अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या कार्यक्रमांची माहिती दिली आहे. यामध्ये गणेश चतुर्थीला भव्य मिरवणुकीने या गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री विजय घाटे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दुसऱ्या दिवशी पासून शालेय विद्यार्थ्यांच्या भेटी तसेच अथर्वशीर्ष पठण होणार आहे. यामध्ये जवळपास तीन हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत, गणेशोत्सवाच्या दहा दिवसात विविध नामांकित शाळांचे विद्यार्थी बापाच्या दर्शनासाठी येणार असून भाऊसाहेब रंगारी वाड्याला भेट देऊन स्वातंत्र्य लढ्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी दिलेले योगदान आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात यासंबंधीचा इतिहास समजून घेणार आहेत.
गणेश भक्तांसाठी दि. २० ते २६ सप्टेंबर या कालावधीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्त तपासणीपासून इतर अनेक तपासण्या करण्यात येणार आहेत, तसेच नेत्रदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय पहिल्या आठवड्यात रिल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, क्रांतिकारी भवनाचा इतिहास याचे रिल करणाऱ्यांना विविध बक्षिसे दिली जाणार आहेत. दि. २५ सप्टेंबरला महिलांचे अथर्वशीर्ष पठण होणार यामध्ये जवळपास दोन हजार पाचशे पेक्षा अधिक महिला सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर दि. २६ सप्टेंबरला सायं. ६ ते रात्री ८ यावेळेत मुंबईच्या सुप्रसिद्ध चिंतामणी ग्रुपचे लाईव्ह बेंजो वादन होणार आहे. याशिवाय गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत विविध मान्यवरांच्या हस्ते रोज रात्रीची आरती होणार असून राजकीय, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी बाप्पाच्या दर्शनासाठी आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनाला भेट देणार आहेत. अनेक भजनी मंडळ देखील या उत्सवात सहभागी होणार आहेत. अनंत चतुर्थदशीला भव्य विसर्जन मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार असल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले.
"सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सुरू केलेल्या गणेशोत्सवाची परंपरा यापुढेही तशीच चालू राहिली पाहिजे. याच भावनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अधिकाधिक गणेश भक्तांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो."
पुनीत बालन (उत्सव प्रमुख)