श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा श्री स्वामी नारायण मंदिराचा देखावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 09:26 AM2022-09-05T09:26:09+5:302022-09-05T09:26:37+5:30

मंडळाची आगळी-वेगळी गणेश मूर्ती पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati view of Sri Swami Narayan Temple | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा श्री स्वामी नारायण मंदिराचा देखावा

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा श्री स्वामी नारायण मंदिराचा देखावा

googlenewsNext

पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने यंदा दिल्लीतील श्री स्वामी नारायण मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी तसेच मंडळाची आगळी-वेगळी गणेश मूर्ती पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.
पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पासह प्रमुख आठ गणेश मंडळांमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची गणना होते. मंदिरातील आतील बाजूस केलेली विद्युत रोषणाई आणि सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

श्री स्वामी नारायण मंदिराच्या प्रतिकृती जवळच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी वाडा आहे. उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी नुकतेच त्याचे नूतनीकरण केले आहे. या वाड्याच्या माध्यमातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा ब्रिटीश साम्राज्याविरोधातील लढ्याचा इतिहास भाविकांना माहिती होत आहे. त्याचबरोबर ब्रिटिशांविरोधात लढाईसाठी वापरलेली शस्त्रास्त्रे ही येथे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या वाड्याला गणेश भक्त आवर्जून भेट देत आहेत.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे 130 वे वर्षे

18 व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे हे एक क्रांतीकारक होते. ते राजवैद्य तर होतेचं पण त्यांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय असल्याने त्यांना ‘रंगारी’ हे आडनाव रूढ झाले. शनिवारवाड्याच्या मागील बाजूला शालुकरांच्या बोळात असलेल्या त्यांच्या राहत्या वाडयात त्या काळात क्रांतीकारक एकत्र जमत असतं. रंगारी यांच्या देवघराच्या आत भिंतीमध्ये त्यांनी शस्त्रे लपवली होती. काही वर्षांपूर्वी वाडयाची डागडुजी करताना ही शस्त्र सापडली. त्यात 9 रायफल, 15 पिस्तुल आणि गोळ्या यांचा समावेश आहे. नुकतेच वाड्याचे नूतनीकरण पूर्ण झाले असून, ‘रंगारी भवन’ येथे या शस्त्रास्त्रांचे वेगळे दालन साकार करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या विचारांपासून सर्वसामान्य माणूस दूर जात आहे या अस्वस्थतेतून इंग्रजांविरूद्ध लढण्यासाठी लोकांना एकत्र आणण्याकरिता भाऊसाहेब रंगारी एक माध्यम शोधत होते. त्यातून सहका-यांच्या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सवाचा विचार पुढे आला.1892 मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मूर्तीची स्थापना केली. राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठविणा-या गणेशाची ही मूर्ती स्वत: भाऊसाहेबांनी तयार केली होती. इंग्रजांचा अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवून देण्याचे त्यांचे ध्येय होते त्याचे प्रतिबिंब या मूर्तीच्या घडणावळीत दिसते. कागद्याचा लगदा आणि लाकडी भुशापासून साकार झालेली ही 130 वर्षांची गणेशमूर्ती असून, ती काहीशी आक्रमक वृत्तीची आहे. दरवर्षी फक्त मूर्तीला रंगरंगोटी करून गणेशोत्सवात ही मूर्ती विराजमान केली जाते.1905 मध्ये भाऊसाहेब रंगारी यांचे निधन झाल्यावर ही जबाबदारी काशिनाथ ठकूजी जाधव यांनी सांभाळली. ते वारल्यानंतर त्यांचे जावई दादा निकम यांनी धुरा सांभाळली. सध्यस्थितीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टमध्ये 9 विश्वस्त असून, मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आहेत.

Web Title: Shrimant Bhausaheb Rangari Ganapati view of Sri Swami Narayan Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.