श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती: वर्गणी आणि स्पीकरविना १३० वर्षांपासून साजरी होतोय गणेशोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 07:07 PM2022-09-03T19:07:21+5:302022-09-03T19:09:07+5:30
सध्यस्थितीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टमध्ये 9 विश्वस्त असून....
पुणे : 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे हे एक क्रांतीकारक होते. ते राजवैद्य तर होतेचं पण त्यांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय असल्याने त्यांना ‘रंगारी’ हे आडनाव रूढ झाले.
शनिवारवाड्याच्या मागील बाजूला शालुकरांच्या बोळात असलेल्या त्यांच्या राहत्या वाडयात त्या काळात क्रांतीकारक एकत्र जमत असतं. रंगारी यांच्या देवघराच्या आत भिंतीमध्ये त्यांनी शस्त्रे लपवली होती. काही वर्षांपूर्वी वाडयाची डागडुजी करताना ही शस्त्रास्त्रे सापडली. त्यात 9 रायफल, 15 पिस्तुल आणि गोळ्या यांचा समावेश आहे. नुकतेच वाड्याचे नूतनीकरण पूर्ण झाले असून, ‘रंगारी भवन’ येथे या शस्त्रास्त्रांचे वेगळे दालन साकार करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याच्या विचारांपासून सर्वसामान्य माणूस दूर जात आहे या अस्वस्थतेतून इंग्रजांविरूद्ध लढण्यासाठी लोकांना एकत्र आणण्याकरिता भाऊसाहेब रंगारी एक माध्यम शोधत होते. त्यातून सहका-यांच्या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सवाचा विचार पुढे आला. 1892 मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मूर्तीची स्थापना केली. राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठविणा-या गणेशाची ही मूर्ती स्वत: भाऊसाहेबांनी तयार केली होती. इंग्रजांचा अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवून देण्याचे त्यांचे ध्येय होते त्याचे प्रतिबिंब या मूर्तीच्या घडणावळीत दिसते. कागदाचा लगदा आणि लाकडी भुशापासून साकार झालेली ही 130 वर्षांची गणेशमूर्ती असून, ती काहीशी आक्रमक वृत्तीची आहे. दरवर्षी फक्त मूर्तीला रंगरंगोटी करून गणेशोत्सवात ही मूर्ती विराजमान केली जाते.
1905 मध्ये भाऊसाहेब रंगारी यांचे निधन झाल्यावर ही जबाबदारी काशिनाथ ठकूजी जाधव यांनी सांभाळली. ते वारल्यानंतर त्यांचे जावई दादा निकमयांनी धुरा सांभाळली. सध्यस्थितीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टमध्ये 9 विश्वस्त असून, मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आहेत.
या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते 130 वर्षात कुणाकडे कधीही वर्गणी मागायला गेले नाहीत. गणेशोत्सवादरम्यान कधीही स्पीकर लावले जात नाहीत ना गुलाल उधळला जातो. ही परंपरा मंडळाने आजतागायत जपली आहे- संजीव जावळे, ( भाऊसाहेब रंगारी यांची चौथी पिढी) अध्यक्ष श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट