'मंगलमूर्ती मोरया' अन् 'आपला गणपती शारदा गणपती' च्या जयघोषात पुण्यात श्रीमंत दगडूशेठ आणि मंडईचे बाप्पा विराजमान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 04:09 PM2021-09-10T16:09:11+5:302021-09-10T16:09:49+5:30
दगडूशेठ अन् मंडईच्या श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना मुख्य मंदिरात साधेपणाने संपन्न
पुणे : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अन् आपला गणपती शारदा गणपतींच्या जयघोषात पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ आणि मंडईचे बाप्पा विराजमान झाले. यंदा कोरोनाचे सावट आणि निर्बंधांमुळे मोजक्याच गणेश भक्तांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.
पुण्यात श्रीमंत विराजमान
मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने निवडक विश्वस्तांच्या उपस्थितीत आणि ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी हा सोहळा साधेपणाने संपन्न झाला. उत्सवकाळात देखील मंदिर बंद राहणार असल्याने कार्यकर्ते मंदिरात दर्शनासाठी जाणार नसल्याचा मोठा निर्णय ट्रस्टतर्फे यंदाही घेण्यात आला आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी आलेल्या भाविकांनी मंदिरावरील आकर्षक विद्युतरोषणाई पाहण्यासोबतच रस्त्यावरुन बाहेरुनच दर्शन घेत कोरोनाचे संकट लवकर दूर होवो, अशी श्रीं ची चरणी प्रार्थना केली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये व ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन विराजमान
अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन मंदिरात विराजमान झाले. चैतन्यमय वातावरणात दुपारी १२ वाजता श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि मीना भोंडवे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली. अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १२८ वे वर्ष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदादेखील साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येत आहे. सूर्य या संकल्पनेवर आधारीत आकर्षक फुलांची आरास मंदिरात करण्यात आली आहे.
अण्णा थोरात म्हणाले, उत्सवकाळात २४ तास आॅनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंडळाच्या https://akhilmandaimandal.org/ या वेबसाईट वरुन शारदा गजाननाचे दर्शन घेता येणार आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. ऑनलाईन पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ६ वाजल्यापासून प्रात:पूजा, आरती, गणेशयाग,सायंपूजा आणि संध्याकाळी ७.३० वाजता महाआरती होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे सर्व शासकीय नियमांचे पालन करुन पुढील 10 दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मंडळाच्या वतीने लसीकरण मोहिम देखील राबविण्यात येत आहे. यासोबतच प्रत्येक २ तासांनी फॉग मशीनच्या सहाय्याने पूर्ण मंदिर सॅनिटाईज केले जाणार आहे