यंदाच्या गणेशोत्सवात 'दगडूशेठला' अध्यक्ष नाही; उत्सवातील निर्णय विश्वस्तांच्या एकमताने होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 03:46 PM2022-08-10T15:46:01+5:302022-08-10T15:46:43+5:30
पंधरा सप्टेंबरला नवीन अध्यक्षाची नियुक्ती होणार - हेमंत रासनेंची घोषणा
पुणे : माजी अध्यक्ष दिवंगत अशोक गोडसे यांच्या नेतृत्वाखाली २०२२ च्या गणेशोत्सवाचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे दगडूशेठला अध्यक्ष नसला तरी त्यांच्या नियोजनाला मान देऊन आणि विश्वस्तांच्या सहमतीने यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सव संपल्यावर १५ सप्टेंबरला नवीन अध्यक्षाची घोषणा करण्यात येईल. अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सावर्जनिक गणपती ट्रस्टचे विश्वस्त उत्सव प्रमुख हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आगामी गणेशोत्सवातील निर्णय विश्वस्तांच्या एकमताने घेतले जातील. अध्यक्ष नसल्याने उत्सवात कोणतीही अडचण येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दरवर्षी राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले जाते. पुणे आणि परिसरातील अनेक गणेश मंडळे यामध्ये सहभागी होतात. त्या स्पर्धेच्या पुणे विभागातील निकालांची घोषणा करण्याकरीता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०१९ च्या पुणे विभागाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, श्री सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळाने द्वितीय, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने तृतीय, नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने चौथे तर सिटी पोस्ट चौक बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १६२ मंडळांपैकी ११२ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १५ लाख ९ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा रासने यांनी केली. यावेळी ट्रस्ट चे डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, कुमार वांबुरे, अक्षय गोडसे, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने उपस्थित होते.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे होणार आहे. राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत संयुक्त प्रसाद मित्र मंडळाच्या प्लास्टिक खेळण्यापासून श्री मूर्ती या देखाव्याला ५१ हजार रुपयांचे, श्री सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळाच्या आकर्षक सजावट या देखाव्यास ४५ हजारांचे, श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या गाझी पाणबुडी हल्ला या देखाव्यास ४० हजारांचे, काळभैरवनाथ तरुण मंडळाच्या नदी जोड प्रकल्प या देखाव्याला ३५ हजारांचे आणि महाराष्ट्र तरुण मंडळाच्या तुमच्यातला एक मी या देखाव्याला ३० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले.
यंदाचा जय गणेश भूषण पुरस्कार धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाला देण्यात येणार आहे. रुपये १ लाख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. स्पर्धेच्या परीक्षण मंडळात पराग ठाकूर, डॉ.अ.ल.देशमुख, विजय चव्हाण, कै. अनिल घाणेकर, मधुकर जिनगरे, बापू पोतदार, सुधीर दारव्हेकर, जयश्री बोकील यांसह सहाय्यक म्हणून बाळकृष्ण घाटे, लिंगराज पाटील, शुभम साळुंके, सौरभ साळेकर, दीप राणे यांनी काम पाहिले.