भाजीपाला खरेदीसाठी झुंबड
By admin | Published: June 2, 2017 02:28 AM2017-06-02T02:28:08+5:302017-06-02T02:28:08+5:30
कर्जमुक्तीबरोबर शेतीमालाला हमी भाव मिळावा, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी गुरूवारपासून संप
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : कर्जमुक्तीबरोबर शेतीमालाला हमी भाव मिळावा, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी गुरूवारपासून संप पुकारला. या संपात शेतकऱ्यांसह कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही सहभाग घेतल्याने भाजी,तसेच फळे आणि दूध उपलब्ध होणार नाही,या विवंचनेने नागरिकांनी भाजी खरेदीसाठी मंडईत गर्दी केली. सायंकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्या तरी मंडईत भाजी खरेदी करण्यास झुंबड उडाली होती.
शेतकरी संपावर गेल्याचे गुरूवारी सकाळीच अनुभवास आले. शेतीला पूरक दुग्धव्यवसाय करणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून दूध शासकीय दूध डेअरीच्या दूध संकलनाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शासकीय दूध डेअरीच्या दुधाऐवजी अन्य खासगी दूगध व्यवसायिकांनी बाजारपेठेत पाठविलेल्या दुधाच्या पिशव्या ग्राहकांना खरेदीकराव्या लागल्या. दूध ही दैनंदिनदृष्टया अत्यंत महत्वाची बाब असल्याने दुसऱ्या दिवशी दुधाचा तुटवडा भासेल, ही शक्यता लक्षात घेऊन ग्राहकांनी गुरूवारी अधिक दूध पिशव्या घेऊन फ्रिजमध्ये ठेवल्या. शेतकऱ्यांचा संप किती दिवस सुरू राहिल, हे निश्चित नसल्याने अनेकांनी नेहमीपेक्षा अधिक भाजी आणि फळे खरेदी केली. मंडईत भाजीच्या दरात आज विशेष दरवाढ नव्हती.
फळे : हातगाडी, टेम्पो विक्रेते गायब
सोसायट्यांमध्ये भाजी, फळे विक्री करण्यास येणारे टेम्पो गुरुवारी दिसून आले नाहीत. अधिकची भाजी खरेदी करून ठेवणे त्यांना परवडणारे नसल्याने शेतकरी संपाच्या काळात टेम्पो घेऊन भाजी विक्रीचे काम त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात थांबवले आहे. नेहमीप्रमाणे फेरिवाले, हातगाडीवालेसुद्धा दिसून आले नाहीत. त्यामुळे बहुतांशी लोकांनी मंडईतून भाजी खरेदी केली.