तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगरावर तळीरामांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:38+5:302021-07-04T04:07:38+5:30
आंबेठाण : जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भामचंद्र डोंगराला मोठा आध्यात्मिक वारसा लाभला आहे. वारकरी संप्रदायाचा ...
आंबेठाण : जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भामचंद्र डोंगराला मोठा आध्यात्मिक वारसा लाभला आहे. वारकरी संप्रदायाचा अभ्यास करण्यासाठी अनेक मुले येथे वास्तव्यास आहेत. परंतु काही लोक येथील पावित्र्य खराब करण्याचे काम करत आहे. अशा टवाळखोर लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.
भामचंद्र डोंगर एक आध्यात्मिक वारसा लाभलेला परिसर आहे. या ठिकाणी स्वच्छ हवा, व्यायाम, अभ्यास, रोज सकाळी संध्याकाळी फिरण्यासाठी, शांत, मन रमण्यासाठी दररोज अनेक नागरिक येत असतात. डोंगरावर जाण्यासाठी दोन पाऊल वाटा आहे. गर्द हिरव्यागार झाडीतून थंड व स्वच्छ हवा अंगावर घेत चढण करावी लागते. साधारण २० ते २५ मिनिटांत डोंगरावर पोहचता येते. डोंगराच्या पायथ्याशी हनुमान मंदिर आहे. तर डोंगरावर महादेवाची पिंड, विठ्ठल रुक्मिणी व संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती येथे आहेत. उंच कातळ कडा आणि गर्द झाडी असल्याने मोर, माकडे व वानरे मोठ्या संख्येने आहेत. तसेच पांडवकालीन लेण्या, पाण्याच्या टाक्या तसेच काही लहान मोठ्या गुहा ही येथे आहेत. औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये डोंगराच्या पायथ्याचा भाग येतो. त्यामुळे या परिसरात वाहनांची व नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. डोंगरावरील गर्द झाडीत सहसा कोणी जास्त जात नसल्याचा फायदा तळीरामांनी घेतला आहे. दुपारी व संध्याकाळी स्थानिक लोक सहसा इकडे फिरकत नाही. त्यामुळे गर्द झाडीत तळीरामांनी हा भाग अड्डा बनला असल्याचे चित्र सध्या पाहवयास मिळत आहे.
म्हाळुंगे पोलिसांकडून बिट मार्शल दिवसातून ठरलेल्या वेळेत भामचंद्र डोंगर येथे पेट्रोलिंग करतील. टवाळखोर लोकांचा योग्य बंदोबस्त केला जाईल.
- अरविंद पवार, पोलीस निरीक्षक, म्हाळुंगे पोलीस चौकी.
भामचंद्र डोंगर.