संसदेच्या राजभाषा समितीवर श्रीरंग बारणे यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 05:44 PM2019-09-28T17:44:44+5:302019-09-28T17:46:20+5:30
बारणे यांनी मागील पाच वर्षात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने संसदेत आवाज उठविला होता.
पिंपरी : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची भारतीय संसदेच्या राजभाषा समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. केंद्र सरकारच्या वतीने संसदेच्या राजभाषा समितीचे गठन केले आहे. गृहमंत्री अमित शहा या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये लोकसभेचे २० आणि राज्यसभेतील १० असे सर्वपक्षीय ३० संसद सदस्य आहेत. त्यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून सलग दुस-यावेळी निवडून आलेल्या बारणे यांची वर्णी लागली आहे. बारणे यांनी मागील पाच वर्षात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने संसदेत आवाज उठविला होता. आता त्यांची राजभाषा समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे. त्यांच्यासह महाराष्ट्रातील तीन खासदारांची वर्णी लागली आहे. त्यामध्ये बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव आणि काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांची वर्णी लागली आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी मागील पाच वर्षात सातत्याने संसदेत आवाज उठविला आहे. आता या समितीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अधिक प्रयत्न करणार आहे.