२८ मार्चला निघणार संभाजी भिडे गुरुजी सन्मान महामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 03:23 PM2018-03-23T15:23:56+5:302018-03-23T15:23:56+5:30
कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना निष्कारण गोवण्यात आले आहे या विचारासह २८ मार्च रोजी पुण्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सन्मान मोर्चा काढणार येणार असल्याची माहिती श्रीशिवप्रतिष्ठान संघटनेतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पुणे :
संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे हे अत्यंत निस्वार्थीपणे राष्ट्रहिताचे काम करीत आहेत. या दोन्ही व्यक्ती जातपात न पाहता काम करत असून त्यांना कोरेगाव भीमा प्रकरणात निष्कारण गोवण्यात आले आहे असे सांगत त्यांच्या समर्थनार्थ २८ मार्च रोजी पुण्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सन्मान मोर्चा काढणार असल्याची माहिती श्रीशिवप्रतिष्ठानचे पराशर मोने यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकबोटे आणि भिडे गुरुजी यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि ज्यांनी दाखल केले त्यांची चौकशी व्हावी अशा मागणीचे पत्र प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या महामोर्चामध्ये बजरंग दल, समस्त हिंदू आघाडी, हिंदू जन जागृती, विविध गणेश मंडळे सहभागी होणार आहेत असे स्पष्ट करण्यात आले. पुढे मोने म्हणाले की, ३१डिसेंबरला पुण्यातील शनिवारवाड्यावर भरवण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेतच विद्वेषपूर्ण लिखाण होते.त्यामुळे या परिषदेला उपस्थित असणाऱ्या आणि चिथावणीखोर भाषणे देणाऱ्या जिग्नेश मेवानी, उमर खालिद आणि बी.जी.कोळसे पाटील यांनाही चौकशीसाठी ताब्यात घ्यावे अशी आमची मागणी आहे. जिल्हाप्रमुख संजय जढार म्हणाले की, गुरुजींचा सदर प्रकरणाशी काडीमात्रही संबंध नाही. गेली अनेक वर्ष गुरुजी या परिसरातदेखील आलेले नाहीत. मात्र प्रसारमाध्यमांचा वापर करून राजकीय हेतूने हा अपप्रचार सुरु आहे. यामुळे राष्ट्रीय ऐक्यास बाधा पोहोचत असून राष्ट्राचे मोठे नुकसान होत आहे. याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.