शुभदा खून प्रकरण : राष्ट्रीय महिला आयोगाची उद्या पुण्यात बैठक; जिल्हाधिकाऱ्यासह पोलिस अधिकारी राहणार उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 15:54 IST2025-01-14T15:53:51+5:302025-01-14T15:54:49+5:30
राष्ट्रीय महिला आयोगाकडून फॅक्ट फायंडिंग कमिटी (घटनेची तथ्य शोध घेणारी समिती) संपूर्ण तपास करत आहे.

शुभदा खून प्रकरण : राष्ट्रीय महिला आयोगाची उद्या पुण्यात बैठक; जिल्हाधिकाऱ्यासह पोलिस अधिकारी राहणार उपस्थित
- किरण शिंदे
पुणे : शहरात कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या शुभदा केदारे (वय २८) हिच्यावर कोयत्याने हल्ला करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार (दि. ६) मंगळवारी घडला. त्यानंतर गुरुवारी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या धक्कादायक घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) गंभीर दखल घेतली असून या खुनाच्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राच्यापोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तातडीने पत्र लिहून या प्रकरणाची जलद आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, पुण्यात राष्ट्रीय महिला आयोगाची उद्या बैठक होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यासह पोलिस अधिकारी राहणार उपस्थित राहणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडून फॅक्ट फायंडिंग कमिटी (घटनेची तथ्य शोध घेणारी समिती) संपूर्ण तपास करत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या बैठकीत सर्व प्रमुख अधिकारी, पुणे जिल्हाधिकारी, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त उपस्थितीत राहणार आहे. WNS कंपनी चे संचालक आणि सुरक्षा अधिकारी यांना सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार आहे.
पुढील १० दिवसात समितीकडून आयोगाला अहवाल देण्याचे निर्देश दिले आहे. केरळच्या माजी पोलीस महासंचालक आर. श्रीलेखा, हरयाणाच्या माजी पोलीस महासंचालक डॉ. बी.के. सिन्हा आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सेक्रेटरी मीनाक्षी नेगी यांचा समितीत सहभागी होणार आहे.
तत्पूर्वी, आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीच्या खून प्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. कृष्णा सत्यनारायण कनोजिया (वय २७, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्याला सोमवारी (दि. १३) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी, त्याच्या वतीने ॲड. सचिन कुंभार, ॲड. संजय खेडकर व ॲड. किरण धरपाळे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने बचावपक्षासह सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
शुभदा आणि कृष्णा हे दोघे कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये अकाउंटंट म्हणून काम करीत होते. मंगळवारी (दि. ६) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास शुभदा ही कंपनीच्या पार्किंगमध्ये आली होती. त्याचवेळी कनोजिया याने तिला पार्किंगमध्ये गाठले. त्याने तरुणीच्या उजव्या हातावर कोयत्याने वार केले. त्यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तरुणी गंभीर जखमी झाली. तिला येरवड्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पैशांच्या देवाणघेवाणीतून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.