गेल्या वर्षीपेक्षा यंदा वाढले ‘शुभमंगल सावधान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:09 AM2021-04-06T04:09:49+5:302021-04-06T04:09:49+5:30
नम्रता फडणीस पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने विवाह समारंभातील संख्येवर मर्यादा आणली आहे. त्यामुळे विवाह सोहळा भव्यदिव्य करण्यापेक्षा ...
नम्रता फडणीस
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने विवाह समारंभातील संख्येवर मर्यादा आणली आहे. त्यामुळे विवाह सोहळा भव्यदिव्य करण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे जोडप्यांचा कल वाढला आहे. गेल्या वर्षभरात ५ हजार २२१ नोंदणी विवाह झाले होते. मात्र, यंदाच्या वर्षी जानेवारी ते मार्च या तीनच महिन्यांत जवळपास निम्मे म्हणजे २ हजार २१ विवाह नोंदणी पद्धतीने झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
‘विवाह’ हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सुंदर आणि अविस्मरणीय क्षण असतो. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्नकार्य करण्याची मजा काहीशी वेगळीच असते. मात्र कोरोनाने जोडप्यांच्या आनंदावर पूर्णत: विरजण पाडले. गेल्या वर्षी अनेकांनी मुहूर्त पाहून विवाहकार्याचे नियोजन केले. मात्र त्यात कोरोनाने मोडता घातला. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा विवाहकार्याच्या संख्येवर मर्यादा आली आहे.
त्यामुळे आता विवाहावर पैसा खर्च करण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करण्यावर अनेक जोडप्यांनी भर दिला असून, कुटुंबीयांकडूनही त्यांच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. २०१९ मध्ये वर्षभरात ७०४६ नोंदणी विवाह झाले होते. गतवर्षी लॉकडाऊनमुळे मार्चचा निम्मा महिना, एप्रिल आणि मेमधील काही दिवस नोंदणी कार्यालय बंद असल्याने आणि या काळात अनेकांच्या नोकरी, व्यवसायांवर गदा आल्याने नोंदणी विवाहांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तीन महिन्यांतच नोंदणी विवाहाचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळाले आहे.
आपल्या सोयीप्रमाणे विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह केला जात आहे. या कार्यालयात नोंदणी करून होणारे विवाह हे विशेष विवाह कायद्यानुसार पार पाडले जातात. विवाहाच्या वेळी किचकट प्रक्रिया नसल्याने आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विवाह समारंभासाठी उपस्थितांची संख्या नियंत्रित केली आहे. त्यामुळेही नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचे प्रमाण वाढत असल्याची माहिती विवाह नोंदणी अधिकारी डी. ए. सातभाई यांनी ’लोकमत’ला दिली.
चौकट
गेल्या आणि यंदाच्या वर्षांतील नोंदणी विवाह
2020 2021
जानेवारी 686 668
फेब्रुवारी 736 671
मार्च 336 692
एप्रिल 0 -
मे 84 -
जून 199 -
जुलै 383 -
आॅगस्ट 431 -
सप्टेंबर 429 -
आॅक्टोबर 544 -
नोव्हेंबर 562 -
डिसेंबर 832 -
------------------------------------------------
एकूण 5222 2031