शुभावरी गायकवाडच्या साथीदाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:11 AM2021-04-07T04:11:44+5:302021-04-07T04:11:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : निकाल बाजूने लावण्यासाठी एका महिलेच्या माध्यमातून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणात शोध घेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : निकाल बाजूने लावण्यासाठी एका महिलेच्या माध्यमातून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणात शोध घेत असलेल्या आणखी एका आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. अजय गोपीनाथन असे या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात अटक असलेल्या शुभावरी गायकवाडशी त्याची दीड वर्षांपासून ओळख असल्याचे समोर आले आहे.
विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी आरोपीला दि.8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
या प्रकरणातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना जतकर यांची जामिनावर सुटका झाली आहे. न्यायदंडाधिकारी जतकर या मध्यस्थी महिलेला त्यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या जमिनीच्या बाबतच्या दाव्यांची माहिती देत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले. लाच स्वीकारणारी महिला शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय 29, रा. मावळ), सुशांत बबन केंजळे (वय 35, रा. रावेत) आणि बडतर्फ पोलिस निरीक्षक भानुदास ऊर्फ अनिल जाधव (रा. मुंबई) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर अजय गोपीनाथन याचा पोलीस शोध घेत होते.
शुभावरी आणि अजय त्यांच्यात आत्तापर्यंत अनेकदा संपर्क झाला आहे. शुभावरीला अटक झालेल्या दिवशी तिने तिचा जुना मोबाईल अजयकडे दिला होता. याबाबत चौकशी केला असतो तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे, असे सरकार पक्षातर्फे विलास घोगरे पाटील यांनी न्यायालयास सांगितले. अजयच्या आवाजाचा नमुना घेत पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी अॅड. घोगरे-पाटील यांनी केली.