आयुक्तालयात महिनाअखेरीस फेरबदल
By admin | Published: April 19, 2016 01:26 AM2016-04-19T01:26:33+5:302016-04-19T01:26:33+5:30
पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये महिनाअखेरीस मोठे फेरबदल होणार असून, काही उपायुक्तांचीच अदलाबदली केली जाण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला का
लक्ष्मण मोरे, पुणे
पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये महिनाअखेरीस मोठे फेरबदल होणार असून, काही उपायुक्तांचीच अदलाबदली केली जाण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला काही उपायुक्तांच्या ‘कर्तव्या’वर नाराज असून, त्यांनी भर बैठकीत या उपायुक्तांचा समाचारही घेतला होता. यासोबतच पोलीस निरीक्षकांच्या बदल्याही करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.
पोलीस आयुक्तालयामध्ये अतिवरिष्ठांच्या गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये पाहायला मिळालेल्या ‘वर्चस्वा’च्या लढाईमुळे शहर पोलीस दलच ‘डिस्टर्ब’ झाले होते. तत्कालीन पोलीस आयुक्त के. के. पाठक आणि सह आयुक्त सुनील रामानंद यांच्यामध्ये निरीक्षकांच्या बदल्या आणि काही परवान्यांच्या फायलींमुळे वाद उफाळून आला होता. या वादाची खमंग चर्चाही पोलीस आयुक्तालयामध्ये रंगलेली होतीच. पाठक आणि रामानंद यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांचे ‘दृश्य’ आणि ‘अदृश्य’ गट तयार झाले होते. यातील पाठक यांचा गट दृश्य होता तर दुसरा गट अदृश्य स्वरूपात कार्यरत होता. अल्पावधीत निर्माण होत गेलेल्या या संशयाच्या वातावरणामुळे काही अधिकाऱ्यांनी या सर्वापासून लांब राहणेच पसंत केले होते. यापूर्वी काही अधिकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळाली नाही, तर काही अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक संधी नाकारली गेली. निरपेक्षपणे काम करणारे आणि कोणत्याही वादामध्ये न पडलेल्या अधिकाऱ्यांना मात्र यापूर्वी कायमच ‘बाजूला’ बसावे लागलेले आहे. अशा अधिकाऱ्यांना नव्या नियुक्त्यांमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
परिमंडल एकच्या उपायुक्तांची नियुक्ती ‘केडर पोस्टिंग’मुळे वादामध्ये अडकली होती. यासोबतच पुण्यामध्ये बदलून आल्यापासून काही उपायुक्त बाजूला बसूनच आपली ‘विशेष’ सेवा बजावत आहेत. काम करण्याची तयारी दर्शवल्यानंतरही त्यांना संधी देण्यात आली नव्हती. शहरातील ११ उपायुक्तांपैकी काही उपायुक्त एका अतिवरिष्ठाच्या जवळचे मानले जातात. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यास सुरुवात केली आहे. ठोस निर्णय घेण्याची तसेच परखड मते मांडण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे अनेकांनी धसका घेतला आहे. गेल्या काही दिवसांत बेकायदा धंद्यांविरुद्ध लावण्यात आलेला धडका, पोलीस ठाण्यांच्या भेटीमध्ये पोलीस आयुक्तांनी नागरिकांना न्याय देण्याचे केलेले आवाहन यामुळे नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. लोकांना पोलीस आयुक्तांकडून अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
उपायुक्तांच्या अदलाबदली करून कामामध्ये आणखी सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याबाबत पुढच्या आठवड््यात बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकंदरीत पोलीस आयुक्त ‘सक्रिय’ झाल्यामुळे काही अधिकाऱ्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, तर काहींना ‘घाम’ फुटला आहे.