बारामतीत शासकीय कार्यालयात शुकशुकाट; हजारो अधिकारी,कर्मचाऱ्यांचा संप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 02:54 PM2023-03-16T14:54:26+5:302023-03-16T14:54:51+5:30
जुनी पेन्शन योजना मागणीच्या संपामुळे अनेक नागरिकांची कामे खोळंबली
सांगवी : कोण म्हणत देत नाय, घेतल्या शिवाय रहात नाही,जुनी पेन्शन योजना सुरू करा, पेन्शन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी बारामती तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी अधिकारी संपात सहभागी झाले होते. देण्यात आलेल्या घोषणाबाजीमुळे सर्व कर्मचारी वर्गाचा या ठिय्यामधून रोष दिसून आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या संपाला पाठिंबा देण्यात आला.
बारामतीच्या प्रशासकीय भवना समोर सर्वांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी सर्वांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून शासकीय-निमशासकीय, शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपात आरोग्य कर्मचारीही सहभागी झाल्याने राज्यातील शासकीय रुग्णालयांतील आरोग्यसेवेसह पंचायत समिती,तहसील कार्यालयातील नागरिकांची कामे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. शासकीय कार्यालये ओस पडल्याने शासकीय कामासाठी आलेल्या लोकांना रिकाम्या हाती परत जावे लागले. राज्यातील आरोग्य कर्मचारी प्रशिक्षणार्थी परिचारिका व कंत्राटी कर्मचारी संपात सहभागी झाले, प्रशासकीय विभागाची सेवा पूर्णत: कोलमडल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिक्षक,आरोग्य कर्मचारी,महसूल कर्मचारी, सर्व शासकीय विभागातील हजारोच्या संखेने अधिकारी कर्मचारी विविध संघटना यावेळी उपस्थित होत्या. संपामुळे अनेक नागरिकांची कामे खोळंबली आहेत. संपामुळे नागरिकांचे हाल होताना दिसून आले.