शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग, ४० ते ५० लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 02:08 AM2018-01-02T02:08:08+5:302018-01-02T02:08:25+5:30
कुरकुंडी (ता. खेड) येथील ओम सुपर मार्केटला शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये दुकानातील सर्वच माल भक्ष्यस्थानी पडून खाक झाला. यामध्ये सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानाचे मालक यामध्ये काही प्रमाणात भाजून जखमी झाले आहेत.
पाईट - कुरकुंडी (ता. खेड) येथील ओम सुपर मार्केटला शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये दुकानातील सर्वच माल भक्ष्यस्थानी पडून खाक झाला. यामध्ये सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानाचे मालक यामध्ये काही प्रमाणात भाजून जखमी झाले आहेत.
कुरकुंडी (ता. खेड) येथील धनराज शुकलाल गुगळीया यांच्या ओम सुपर मार्केट या दुकानास सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. दुकानातून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर ते पाहण्यासाठी गेले असता अचानक आगीचा भडका झाल्याने ते त्यामध्ये जखमी झाले.
या वेळी लागलेली ही आग ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ती विझविण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. परंतु आतमध्ये खाद्यतेलाचे डबे असल्याने आग विझविण्यामध्ये ग्रामस्थांचे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेरीस राजुरुनगर नगर परिषदेची व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक गाड्या आल्यानंतर रात्री ९.३० वा. आग आटोक्यात आली.
जीवितहानी नाही
सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी आगीमध्ये सर्वच माल जळून खाक झाला. पश्चिम भागातील ते सर्वांत मोठे होलसेल दुकान होते. आगीच्या झळा घर आणि गोडाऊनलाही लागल्या. यामध्ये दुकानाची इमारतही पूर्ण जळाली असून, तिचे नुकसान सोडता दुकानातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
यामध्ये दुकानाचे मालक जखमी झाले असल्याने आज पंचनामा करता आला नसल्याने नुकसानीचा प्राथमिक अंदाज येऊ शकला नाही.
या बाबत त्यांचे बंधू भागचंद शुकलाल गुगळीया यांनी चाकण पोलिसात तक्रार दिली असून, पोलीस हवालदार मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.