श्वेतांग निकाळजेला अटक
By Admin | Published: February 7, 2015 11:59 PM2015-02-07T23:59:39+5:302015-02-07T23:59:39+5:30
मागील दीड वर्षांपासून पोलिसांना विविध गुन्ह्यांमध्ये हवा असलेला कुख्यात गुन्हेगार श्वेतांग ऊर्फ श्वेत्या भास्कर निकाळजे याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
पुणे : मागील दीड वर्षांपासून पोलिसांना विविध गुन्ह्यांमध्ये हवा असलेला कुख्यात गुन्हेगार श्वेतांग ऊर्फ श्वेत्या भास्कर निकाळजे याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ पिस्तुले आणि ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपी श्वेत्या निकाळजे (वय २६, रा. ३३५, मंगळवार पेठ, सध्या रा. समृद्धी अपार्टमेंट, आंबेगाव पठार) हा मागील दीड वर्षापासून जामिनावर बाहेर होता. शशिकांत चंद्रकांत मुरमुरे (२४, रा. ८६१, कसबा पेठ) आणि अक्षय बाबूराव चव्हाण (२३, रा. गुजरवाडी फाटा, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या निकाळजेच्या साथीदारांची नावे आहेत. आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. आरोपी श्वेत्याविरुद्ध भारती विद्यापीठ आणि ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा, शिवाजीनगर आणि फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा आणि दरोड्याच्या तयारीत असतानाचा तर येरवडा आणि समर्थ पोलीस ठाण्यात बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी शशिकांत मुरमुरेविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. श्वेत्या व त्याच्या साथीदारांनी शिवाजीनगर न्यायालयातही गोळीबार केला होता. हडपसर येथील गुन्ह्यात वेळेत आरोपपत्र दाखल न झाल्याने श्वेत्याला जामीन मिळाला होता.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्वेत्या आणि त्याचे साथीदार फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कमला नेहरू रुग्णालयाजवळ येणार असून, त्यांच्याकडे बेकायदेशीर शस्त्रे असल्याबाबतची माहिती पोलीस नाईक इरफान मोमीन यांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांच्या सूचनेनुसार दोन पथके तयार करण्यात आली. दोन्ही पथकांनी रुग्णालयाजवळ सापळा रचला
होता. श्वेत्या व त्याचे दोन्ही साथीदार त्याठिकाणी आल्यानंतर
शनिवारी दुपारी त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे आढळून
आली.
गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके, उपायुक्त जयंत नाईकनवरे, सहायक आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे, सहायक निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस नाईक इरफान मोमीन, हवालदार रमेश भोसले, रवींद्र कदम, संभा भोईटे, दिलीप मोरे, प्रकाश लोखंडे, प्रभाकर हिरगुडे यांच्या पथकाने कारवाई केली. (प्रतिनिधी)
आरोपी शशिकांत मुरमुरेविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. श्वेत्या व त्याच्या साथीदारांनी शिवाजीनगर न्यायालयातही गोळीबार केला होता. हडपसर येथील गुन्ह्यात वेळेत आरोपपत्र दाखल न झाल्याने श्वेत्याला जामीन मिळाला होता.