एसटी-दुचाकी अपघातात भावंडांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:15 AM2021-08-21T04:15:35+5:302021-08-21T04:15:35+5:30
रोहित गोपीनाथ रासकर (वय १९, रा. तळेगाव ढमढेरे, कासारी, ता. शिरूर) व प्रज्वल गणेश भास्कर (वय १३, रा. जुन्नर) ...
रोहित गोपीनाथ रासकर (वय १९, रा. तळेगाव ढमढेरे, कासारी, ता. शिरूर) व प्रज्वल गणेश भास्कर (वय १३, रा. जुन्नर) असे अपघातात ठार झालेल्या मुलांची नावे आहेत. अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल एसटी चालक किसन बाळू गीते (रा. लोहसर, ता. पाथर्डी) याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ रामदास रासकर (रा. तळेगाव ढमढेरे) यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांचा पुतण्या रोहित रासकर हा मोटारसायकल (एम एच १२ एस डब्ल्यू ०४९५) घेऊन जुन्नर येथे मावशीला भेटण्यासाठी गुरुवारी गेला होता. रात्री मावशीकडे मुक्काम करून आज सकाळी तो मावसभाऊ प्रज्वल गणेश भास्कर याला पाठीमागे बसवून सकाळी दहा वाजता जुन्नर येथून घरी निघाला होता. दुचाकी नारायणगाव येथून मंचरकडे येत होती. महात्मा गांधी विद्यालयासमोर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून नेहरूनगर ते पिंपळगाव रोठा ही एसटी बस समोरून येत दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये रोहित गोपीनाथ रासकर व मागे बसलेला प्रज्वल गणेश भास्कर हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वी दोघांचा मृत्यू झाला.
चौकट
वाढदिवसाच्या दिवशीच काळाचा घाला
अपघातात ठार झालेल्या रोहित गोपीनाथ रासकर याचा आज वाढदिवस होता. रात्री मावशीकडे जुन्नर येथे वाढदिवस साजरा करण्यात आला. आज रोहित याचा वाढदिवस घरी तळेगाव ढमढेरे येथे साजरा केला जाणार होता. वाढदिवसासाठी तो प्रज्वल भास्कर या मावसभावला घेऊन घरी निघाला असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती समजल्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या घरी शोकाकुल वातावरण झाले. मंचर पोलीस ठाण्यासमोर नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा पाहवत नव्हता.