आजारी कुत्र्याच्या डोक्यात रॉडने प्रहार करून ठार मारले, पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 01:41 PM2021-11-09T13:41:50+5:302021-11-09T14:08:24+5:30
पुणे : दत्तवाडी परिसरातून एक क्रूर प्रकार उघडकीस आलाय. आजारी असलेल्या कुत्र्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून त्याला ठार मारण्यात ...
पुणे: दत्तवाडी परिसरातून एक क्रूर प्रकार उघडकीस आलाय. आजारी असलेल्या कुत्र्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून त्याला ठार मारण्यात आले. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एका प्राणीप्रेमीने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अमोल खेडकर (रा. दत्तवाडी) याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवले याप्रकरणी कलम 428 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 52 वर्षीय महिलेने या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दत्तवाडी परिसरात राणी नावाचे हे कुत्रे मागील अनेक वर्षापासून राहत होते. मागील काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे ते विव्हळत होते. त्याच्या या विव्हळण्याचा राग आल्याने आरोपीने तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिला बावधन येथील ॲनिमल रेस्क्यू फाउंडेशनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना या कुत्र्याचा मृत्यू झाला. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.