पहिल्या दिवशी सिद्धीविनायकच्या २८१ धावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:11 AM2021-02-24T04:11:58+5:302021-02-24T04:11:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : व्हिजन क्रिकेट अकादमीच्या वतीने व संतोष मते परिवाराच्यावतीने आयोजित पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : व्हिजन क्रिकेट अकादमीच्या वतीने व संतोष मते परिवाराच्यावतीने आयोजित पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत श्री सिद्धीविनायक क्रिकेट क्लब संघाने २८१ धावा करत पहिल्या दिवशी वर्चस्व राखले.
सिंहगड रस्त्यावरील व्हिजन स्पोर्ट्स सेंटर येथील मैदानावर मंगळवारी (दि.२३) सुरू झालेल्या स्पर्धेत श्री सिद्धीविनायक क्रिकेट क्लब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ‘सिद्धीविनायक’ने दिवसअखेर ७६ षटकांत ९ बाद २८१ धावा केल्या.
आघाडीच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्याने ‘सिद्धिविनायक’चा संघ १५ षटकांत ४ बाद ६१ असा अडचणीत आला. त्यानंतर संदीप शिंदेने ७१ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ४९ धावा करून संघाचा डाव सावरला. यानंतर आदित्य कर्जतकरने ६४ चेंडूत ६ चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद ४१ धावा व कुणाल तांजनेने ५० चेंडूत नाबाद २९ धावा केल्या. या दोघांनी दहाव्या गड्यासाठी १०२ चेंडूत ७३ धावांची भागीदारी करून संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.
‘सिद्धिविनायक’चा पहिल्या डावातील १४ षटकांचा खेळ अजून बाकी आहे. व्हिजन क्रिकेट अकादमी संघाकडून रोनक राठी (३-६३), गणेश जोशी (२-७८), शौनक त्रिपाठी (२-३२), ओमकार मोगलगिड्डीकर(१-२५) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
स्पर्धेचे उद्घाटन व्हिजन स्पोर्ट्स सेंटरचे संस्थापक संचालक संतोष मते यांच्या हस्ते करण्यात आले.