बेकायदा विक्रेत्यांनी व्यापले पदपथ, चालायचे कुठून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:08+5:302021-07-20T04:10:08+5:30
बेकायदा विक्रेत्यांनी व्यापले पदपथ, चालायचे कुठून? लॉकडाऊन काळातील परिस्थिती : लक्ष्मी रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील स्थिती पुणे : ...
बेकायदा विक्रेत्यांनी व्यापले पदपथ, चालायचे कुठून?
लॉकडाऊन काळातील परिस्थिती : लक्ष्मी रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील स्थिती
पुणे : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आणि प्रचंड वर्दळीच्या असलेल्या मध्यवस्तीतील प्रमुख रस्त्यांना अतिक्रमणांचे लागलेले ग्रहण लॉकडाऊन काळातही सुटलेले नाही. विशेषत: लक्ष्मी रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील पदपथांवर असलेली अतिक्रमणे हटविण्यात पालिकेच्या अतिक्रमण विभागाला अपयश आलेले आहे. दुपारी चारपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी असली तरी मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी ठरू शकते. दुकानदारांनी पदपथ व्यापल्याने चालायचे कुठून? असा सवाल पादचारी उपस्थित करीत आहेत.
शहराच्या मध्यवस्तीतील लक्ष्मी रस्ता हा कपड्यांची आणि सुवर्णकारांची मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी शहराच्या सर्वच भागातून तसेच राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. त्यांना याठिकाणी वाहने लावण्यास जागा शिल्लक राहिलेली नाही. लक्ष्मी रस्त्यावरील दुकानदारांनी तर इमारतींमधील पार्किंगच दुकानांमध्ये बदलून टाकले आहे. बहुतांश इमारतींमधील पार्किंग नाहीसे झाल्याने वाहने रस्त्यावर लागत आहेत. या दुकानांमधील कामगारांची वाहने दुकानाबाहेर लावली जातात. त्यामुळे ग्राहकांना वाहने लावता येत नाहीत. त्यातच पदपथांवर दुकाने थाटण्यात आल्याने रस्त्याने चालत जाण्यातही अडचणी येत आहेत. या पथारीधारकांकडून काही दुकानदार मासिक भाडे घेत असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.
====
फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर पदपथांवर महिलांची आभूषणे, अंतर्वस्त्रे, चपला, बूट, मोजे, खाद्यपदार्थ आदींचे शेकडो स्टॉल मोठ्या प्रमाणावर लावण्यात येतात. निम्म्यापेक्षा अधिक पदपथ या अतिक्रमणांनी व्यापलेला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना जा-ये करण्यात अडचणी येतात. नागरिकांनी याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यावर अरेरावी केली जाते. राजकीय वरदहस्त आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने या रस्त्यावर बेकायदा दुकाने सुरू असल्याचे चित्र आहे.
====
हे चित्र केवळ या दोन रस्त्यांवरच नाही तर, मध्यवस्तीतील महात्मा फुले मंडई परिसर, शिवाजी रस्ता, सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्त्यावरही पहायला मिळते आहे. पुण्यातील जवळपास सर्वच रस्त्यांसह गल्लीबोळातही ही अतिक्रमणे वाढत चालली आहेत.
====
पालिकेने अधिकृत केलेल्या पथारी व्यावसायिकांना दैनंदिन शुल्काची आकारणी केली जाते. पथारी व्यावसायिक हे शुल्क भरतातही. मात्र, ज्यांच्याकडे पालिकेचे प्रमाणपत्र नाही अशा पथारीधारकांवर कारवाई केली जात नाही. शहरात वेगवेगळ्या रस्त्यांवर ‘चौपाट्या’ सुरू केल्या जात आहेत. रस्त्यावर अन्नपदार्थ शिजविण्यास मनाई असतानाही रस्त्यावर घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करून अन्नपदार्थ शिजविले जात आहेत.
===
लॉकडाऊन काळात नागरिकांनी घराबाहेर अत्यावश्यक कारणांसाठीच पडावे अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, दुकानांना वेळाही ठरवून देण्यात आलेल्या आहेत. मात्र, नियम फक्त काही ठरावीक लोकांनाच आहेत काय? पदपथावरून चालत जाणे कठीण झाले आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांना हा दैनंदिन त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
- सुनंदा ठकार, रहिवासी, प्रभात रस्ता
====
महापालिकेकडे तक्रार केली की तात्पुरती कारवाई केली जाते. मात्र, एक-दोन दिवसांत पुन्हा सर्व परिस्थिती जैसे-थे अशीच असते. या रस्त्यांवरून रोज पोलीस, महापालिकेचे अधिकारी कर्मचारी ये-जा करीत असतात. त्यांना ही अतिक्रमणे दिसत नाहीत का? पदपथावरून चालता येत नसल्याने नाइलाजाने रस्त्यावरून जावे लागते. वाहनांच्या वर्दळीमध्ये अपघाताची भीती वाटते.
- मंगेश साळुंखे, रास्ता पेठ, पुणे