संतप्त शेतकऱ्यांचा अधिकाऱ्याला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2016 01:20 AM2016-01-21T01:20:19+5:302016-01-21T01:20:19+5:30
दुष्काळी परिस्थितीमुळे उभी पिके पाण्याअभावी जळून चालली असताना जुन्या कालव्याचे पाणी दौंड तालुक्यात अद्याप पोहोचले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज
यवत : दुष्काळी परिस्थितीमुळे उभी पिके पाण्याअभावी जळून चालली असताना जुन्या कालव्याचे पाणी दौंड तालुक्यात अद्याप पोहोचले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज पाटबंधारे विभागाच्या यवत उपविभागीय कार्यालयात जाऊन शाखा अधिकाऱ्याला घेराव घातला. या वेळी संतप्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शाखा अभियंत्यांची चांगलीच भंबेरी उडाली.
यंदा पाऊसच झालेला नसल्याने खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा कमी आहे. उपलब्ध असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याने धरणातून मुठा उजवा कालव्याद्वारे शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आलेले नाही. यामुळे दौंड तालुक्यातील शेती पाण्याअभावी अडचणीत आली आहे. त्यातच शासनाने जुन्या कालव्यातून (बेबी कॅनॉल) नदीतील पाणी शुद्धीकरण करून सोडले जाणार असल्याचे सांगितले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतीसाठी आवर्तन मिळू शकेल, असे सागितले होते. मात्र, कॅनॉलचे काम न झाल्याने पाणी सोडण्यास उशीर झाला.
पाणी सोडण्यासाठी गळती बंद होऊन कामे पूर्ण होण्याची आवश्यकता आहे, असे कारण पाटबंधारे विभागातील अधिकारी शेतकऱ्यांना देत होते. मात्र, आता कामे पूर्ण झाली तरी पाणी येत नाही. अखेर आज संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढून याचा जाब विचारला. या वेळी पाटबंधारेचे शाखा अभियंता काळे, भाजपाचे तानाजी दिवेकर,
भाजपाचे दौंड तालुकाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे, दौंड तालुका भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष उत्तमराव गायकवाड, दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अरविंद दोरगे, बाबा शेळके, किसन दोरगे, राहुल अवचट व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
तीन दिवसांत पाणी पोहोचेल...
शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहता, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता काळे यांनी तीन दिवसांत दौंड तालुक्यात जुन्या कालव्याचे पाणी पोहोचेल, असे आश्वासन दिले. मात्र, शेतकऱ्यांनी लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. अखेर तोंडी आश्वासन मिळाल्यानंतर तीन दिवसांत पाणी न आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांनी दिला.कामे पूर्णत्वास जात असताना आता नवीनच समस्या उभी राहिली असून, त्यासाठी पाटबधारे विभाग पाण्याचे योग्य नियोजन करीत नसल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी आज
थेट पाटबंधारे विभागाच्या यवत कार्यालयात मोर्चा आणला.