घराला वेढा अन् दीडशे घरफोड्या करणाऱ्या संगतसिंगला बेड्या; वाचा कोंढवा पोलिसांच्या कारवाईचा थरार...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 11:57 AM2023-09-08T11:57:26+5:302023-09-08T11:58:38+5:30

चोरट्याला केलेल्या चौकशीत तब्बल 150 घरफोड्या केल्याचे निष्पन्न, त्याच्या ताब्यातून 37 तोळे सोन्याचे दागिने जप्त

Siege the house and handcuff Sangat Singh who did 150 burglaries Read the thrill of Kondhwa police action... | घराला वेढा अन् दीडशे घरफोड्या करणाऱ्या संगतसिंगला बेड्या; वाचा कोंढवा पोलिसांच्या कारवाईचा थरार...

घराला वेढा अन् दीडशे घरफोड्या करणाऱ्या संगतसिंगला बेड्या; वाचा कोंढवा पोलिसांच्या कारवाईचा थरार...

googlenewsNext

किरण शिंदे 

पुणे : कोंढवा पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलने कारवाई करत एका अट्टल चोरट्याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी आजवर तब्बल 150 घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. संगतसिंग अजमेर सिंग कल्याणी (वय 40, रा. थेऊर रोड, लोणी काळभोर) असे या चोरट्याचे नाव आहे. कोंढवा पोलिसांनी त्याच्या थेऊर येथील घराला वेढा घालून ही कारवाई केली. त्याच्या ताब्यातून 37 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक संजय मोगले पोलीस कर्मचारी अमोल हिरवे सुहास मोरे विकास मरगळे राहुल वंजारी यांच्यासह कोंढवा पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कोंढवा पोलिसांचे पथक काम करत होते. त्यावेळी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत असताना आरोपी संगतसिंग याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याने कोंडव्यातील कुबेरा पार्क सोसायटीत घरफोडी केली होती. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक माहिती काढली असता तो थेऊर फाटा येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कोंढवा पोलिसांचे एक पथक त्याला पकडण्यासाठी गेले. मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने स्वतःला घरात बंद करून घेतले. तब्बल चार ते पाच तास तो घरातच बसून होता. पोलिसांना झुलवत ठेवत मागील दरवाजाने पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्नही केला. मात्र पोलिसांनी घराला चारही बाजूने घेरल्याने त्याचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला शर्थीने ताब्यात घेत अटक केली.

त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मात्र धक्कादायक माहिती समोर आली. त्याने आजवर 150 हून अधिक घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. पुणे शहरातील हडपसर, बिबवेवाडी, अलंकार, लोणीकंद, कोथरूड, पर्वती, वानवडी, सिंहगडसह पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही अनेक गुन्हे दाखल आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास तो साथीदारांसह जाऊन घरफोडी करायचा. आता मात्र त्यांनी ही पद्धत बदलली असून ओळख पटू नये यासाठी तोंडाला रुमाल बांधून आणि डोक्यावर टोपी घालून दिवसा घरफोडी करत होता.

Web Title: Siege the house and handcuff Sangat Singh who did 150 burglaries Read the thrill of Kondhwa police action...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.