शेलपिंपळगावात बिबट्याचे दर्शन

By admin | Published: September 15, 2016 01:36 AM2016-09-15T01:36:14+5:302016-09-15T01:36:14+5:30

खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ऊसक्षेत्रात नागरिकांना दिवसा ढवळ्या बिबट्याचे दर्शन घडू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

The sight of the leopard in Sheelpimpalgaon | शेलपिंपळगावात बिबट्याचे दर्शन

शेलपिंपळगावात बिबट्याचे दर्शन

Next

शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ऊसक्षेत्रात नागरिकांना दिवसा ढवळ्या बिबट्याचे दर्शन घडू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आज (दि.१४) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास वाजेवाडीच्या (ता.शिरूर) पश्चिमेकडील साबळेवाडीच्या बाजूने भोंडवेवस्ती लोहोटवस्तीकडे जाणाऱ्या पोटकालव्यावर येथील तरुणांना बिबट्या आढळून आला.
यापूर्वी चौफुला, मांजरेवाडी, साबळेवाडी, तसेच करंदी गावच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांच्या निदर्शनात आले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सतत आढळून येत असलेल्या बिबट्याकडे नागरिक दुर्लक्ष करत होते. परंतु आज पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन घडून आल्याने संपूर्ण वाजेवाडीसह शेजारील गावांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांची झोपच उडाली आहे.
दोन महिन्यांपूर्वी चौफुला परिसरात नवनाथ बेंडभर यांना त्यांच्या विहिरीवर बिबट्या तोंडात शिकार घेऊन जात असताना पाहिला होता. तर मागील आठवड्यात करंदी हद्दीतील मारुती मंदिराशेजारी लोकमत प्रतिनिधीच्या वाहनाला अंगावर टिपक्या असलेला बिबट्या आडवा गेला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी वढू येथील एका तरुणाने बिबट्या पाहिल्याचे सांगितले होते.
या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, मारुती मंदिरालगत डोंगराळ भागात झाडाचे दाट वास्तव्य पसरलेले आहे.
त्यामुळे बिबट्याला लपून बसण्यासाठी जागा उपलब्ध होत असल्याने बिबट्याने परिसरात ठाण मांडल्याचे नाकारता येत नाही.
वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी दिसणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तत्काळ दोन -तीन ठिकाणी पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: The sight of the leopard in Sheelpimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.