Video: वरसगाव धरणावर महाकाय मगरीचे दर्शन; रेस्क्यू पथकाने मगरीला मूळ अधिवासात सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 12:54 PM2024-08-08T12:54:19+5:302024-08-08T12:56:40+5:30
खडकवासला धरण साखळीत मगरी दिसून येत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या, आता मगरींचा अधिवास असल्याचे स्पष्ट झाले
पुणे: खडकवासला धरण साखळीतील सर्वात मोठे धरण असलेल्या वरसगाव धरणाच्या भिंतीवर मंगळवारी रात्री महाकाय मगर आढळून आली. तातडीने वन विभागाला माहिती देण्यात आल्यानंतर बावधन येथील वन्य प्राण्यांचे रेस्क्यू करणाऱ्या पथकाने या मगरीला पकडून मूळ अधिवासात सोडले.
वनविभाग आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वरसगाव धरणाच्या मुख्य भिंतीवर लोखंडी गेटजवळ गवतात पाच ते सहा फूट लांबीची पूर्ण वाढ असलेली मगर रात्री साडेआठच्या सुमारास गस्तीवर असलेल्या राहुल जाधव व कुणाल कुराडे या कर्मचाऱ्यांना दिसली. त्यांनी बॅटरीच्या उजेडात मगर असल्याची खात्री केली. वरसगाव धरणाचे शाखा अभियंता वीरेश राऊत यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे वेल्हे तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगोटे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. बावधन येथील वन्य प्राण्यांचे रेस्क्यू करणाऱ्या पथकाला पाचारण केले.
वरसगाव धरणावर महाकाय मगरीचे दर्शन; रेस्क्यू पथकाने मगरीला मूळ अधिवासात सोडले#Pune#varasgaon#water#DAMpic.twitter.com/6FljmdjYEE
— Lokmat (@lokmat) August 8, 2024
गोविंद लंगोटे यांनी सांगितले की, पूर्ण वाढ झालेली ही मगर तिचा मार्ग चुकल्याने धरणाच्या भिंतीवर गेटमधून आली. परत तिला पाण्याकडे जाण्याचे सुचले नसावे, म्हणून ती याच परिसरात फिरत होती. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मगरीला पकडण्याची मोहीम सुरू केली. रेस्क्यू पथकाच्या १५ जवानांसह वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगोटे, वनरक्षक मनोज महाजन, सुनीता अर्जुन, स्वप्नील उंबरकर यांच्यासह दहा कर्मचारी आणि धरणावरील सुरक्षा रक्षक हे मगरीला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. अखेर साडेतीन वाजता मगरीला पकडून एका रेस्क्यू व्हॅनमध्ये ठेवले. परत भिंतीवर येण्याची शक्यता असल्याने या मगरीला तेथेच परत पाण्यात सोडण्याऐवजी वेगळ्या अधिवासात सोडल्याची माहिती लंगोटे यांनी दिली.
पाणी कमी झाल्यावर उन्हाळ्यात मगर पाण्याबाहेर आल्याची अनेकदा दिसली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट असते. पहाटे मगर पकडली असली तरी अजून अनेक मगरी धरणात असाव्यात. -देविदास हनमघर, सरपंच, साईव बुद्रुक, तालुका वेल्हे
मगरींचा अधिवास असल्याचे स्पष्ट
खडकवासला, पानशेत, वरसगाव या धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत मगरी दिसून येत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिक सातत्याने करत आहेत. खडकवासला धरणाच्या मागे काही वर्षांपूर्वी मगर आढळून आली होती. तसेच खानापूर येथील पाणवठ्याजवळ मगरीचे पिल्लू आढळून आले होते. आता वरसगाव धरणाच्या भिंतीवर मगर आढळून आल्याने धरण साखळीत मगरींचा अधिवास असल्याचे स्पष्ट झाले आहे.