Pune: कोरेगाव भिवर येथे ऊसतोड चालू असताना बिबट्याचे दर्शन, शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 11:59 AM2023-10-12T11:59:02+5:302023-10-12T11:59:53+5:30
बिबट्याचे बछडे दुपारच्या दरम्यान नजरेस पडल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे....
पाटेठाण : कोरेगाव भिवर (ता. दौंड) येथे शेतात ऊसतोड चालू असताना ऊसतोड कामगारांना बिबट्याचे बछडे दुपारच्या दरम्यान नजरेस पडल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरेगाव भिवर येथील शेतकरी योगेश आणि प्रथमेश कुल यांच्या पठारावरील शेतात ऊसतोड चालू असून, बछड्यांचे दर्शन झाल्यावर कामगार वर्ग भयभीत झाला आहे. राहूबेट परिसरात मुबलक प्रमाणात असलेले ऊसपिकाचे क्षेत्र यामुळे वन्य प्राण्यांना लपण्यासाठी जागा मिळत असून, परिणामी दोन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळूनसुद्धा परिसरात आणखी बिबटे ग्रामस्थांना दिवसादेखील नजरेस पडत असल्याने शेतात काम करताना शेतकरी, कामगार, मजूर, महिला यांच्यात भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे. राहू गावातील काही ग्रामस्थांना शेताच्या बांधावरून बिबट्याची मादी दोन लहान बछड्यांसह नजरेस पडल्याने पुन्हा घबराट निर्माण झाली आहे.
या संदर्भात वनरक्षक शिवकुमार बोंबले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या शेतात जाऊन ठशांचे नमुने तपासून परिसरात पिंजरा लावण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.