सिग्नल तोडला, हेल्मेट नाही; १० लाख पुणेकरांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:11 AM2021-09-24T04:11:12+5:302021-09-24T04:11:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या नागरिकांना ऑनलाईन ई-चलन आकारले जाते. मात्र, बहुतांश पुणेकरांनी वर्षानुवर्षे दंडाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या नागरिकांना ऑनलाईन ई-चलन आकारले जाते. मात्र, बहुतांश पुणेकरांनी वर्षानुवर्षे दंडाची रक्कम भरली नसल्याने न्यायालयाकडून त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या अचानक येऊ लागलेल्या नोटिसांमुळे पुणेकरांचे धाबे दणाणले असून, आपल्या गाडीवर कोणता दंड आहे का? असेल तर तो किती? हे तपासण्यासाठी पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. जिल्ह्यात जवळपास दहा लाख नागरिकांना न्यायालयाने नोटिसा पाठवल्या आहेत. वाहनचालकांना पाठवलेल्या लिंकवर तत्काळ दंड भरणा केल्यास त्यांना न्यायालयात येण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे ‘त्वरित दंडाची रक्कम भरा; अन्यथा न्यायालयात दाव्याला सामोरे जा,’ अशी स्थिती आहे.
एक काळ असा होता की एखाद्या वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्याकडून त्याचवेळी दंड वसूल केला जाईल. मात्र, आता वाहतूक विभागाने ‘ई चलन’ची ऑनलाईन सेवा कार्यान्वित केली आहे. एका क्लिकवर तुम्हाला दंडाची रक्कम थेट भरता येणे शक्य आहे. मात्र, अनेकदा वाहनचालकांना आपल्या गाडीवर चलन आकारण्यात आले आहे, याची माहितीच नसते. त्यामुळे वर्षानुवर्षे वाहनचालकांकडून चलनाची रक्कम भरली जात नाही आणि दंडाच्या रकमेचा आकडा वाढतच जातो.
यंदा प्रथमच वाहतूक पोलिसांनी ऑनलाईन पद्धतीने आकारलेल्या ई-चलनाचे दावे शनिवारी (दि. २५) लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत. त्यामुळे नोटीस मिळालेल्या वाहनचालकांना न्यायालयात न येता त्यांचा दावा मिटवता येणार आहे. ज्या वाहनचालकांना न्यायालयात येऊन रक्कम भरायची आहे, त्यांनी मोटर व्हेईकल कोर्टात येऊन रक्कम भरली तरी चालणार आहे. ज्या वाहनचालकांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यांचे दावे न्यायालयात दाखल करण्यासाठी प्रलंबित आहेत. जे वाहनचालक दंडाची रक्कम भरणार नाहीत, त्यांचे दावे न्यायालयात दाखल केले जातील. त्यामुळे न्यायालयात दावा दाखल होण्यापेक्षा संबंधित लिंकवर वाहनचालकांनी दंडाची रक्कम भरावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत यांनी सांगितले.