आता सिग्नलला डावीकडे ‘बिनदिक्कत’पणे वळता येणार : चौकातली वाहतूक कोंडी कमी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 03:11 PM2020-12-19T15:11:19+5:302020-12-19T15:11:49+5:30
प्रत्येक चौकात सिग्नलला वाहनचालकांना डावीकडे वळण घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पुणे : सिग्नलला उभे राहिल्यानंतर डावीकडे वळण घेणाऱ्या वाहनचालकांनाही विनाकारण चौकात ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे इंधन आणि वेळ यांचा अपव्यय होतो. त्यामुळे प्रत्येक चौकात सिग्नलला वाहनचालकांना डावीकडे वळण घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत मंजूर केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
सिग्नलला ‘लेफ्ट हॅन्ड फ्री’ असावा असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अॅड. भैय्यासाहेब जाधव आणि शिवसेनेचे नगरसेवक अविनाश साळवे यांनी समितीसमोर ठेवला होता. समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली असून मुख्यसभेने मंजुरी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
शहरातील अनेक चौक अरुंद आहेत. तसेच या चौकांना जोडणा-या रस्त्यांची रुंदीही कमी आहे. त्यातच चौकाचौकात अतिक्रमणे वाढत चालली आहेत. त्यामुळे सिग्नल लागताच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे ज्यांना डावीकडे वळायचे असते त्यांनाही वळता येत नाही. जर या वाहनचालकांना चौकात न थांबता थेट वळण्यास परवानगी दिली तर वाहतुकीची होणारी कोंडी 33 टक्क्यांनी कमी होऊ शकते असे जगताप यांनी सांगितले.
हा प्रस्ताव आता मुख्य सभेसमोर ठेवला जाणार असून चौकातील वाहतुक व्यवस्था, उपलब्ध जागा आणि नकाशा याचाही विचार केला जाणार आहे. मुख्यसभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव वाहतुक पोलिसांकडे पाठविला जाणार आहे.
=====
दिल्ली, चंदीगड, बेंगळुरू इत्यादी मोठ्या शहरांमध्ये, प्रत्येक चौकात डावीकडे थेट वळण्यास परवानगी आहे. या शहरांमधील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. या शहरांप्रमाणेच पुण्यातही प्रत्येक चौकात वाहनचालकांना डावीकडे वळण घेण्यास परवानगी देणारा प्रस्ताव शहर सुधारण समितीने मंजुर केला आहे. ‘लेफ्ट वे फ्री’ केल्यानंतर वळणावरील वाहतुक नियंत्रण दिव्यांची (सिग्नल) आवश्यकता भासणार नाही. तसेच चौकातील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
- प्रसन्न जगताप, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती