सिग्नल दुरुस्ती प्राधान्याने करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 03:11 AM2018-08-26T03:11:05+5:302018-08-26T03:11:29+5:30
महापालिका, वाहतूक पोलीस समन्वय समिती : हातगाड्यांसह टपऱ्यांवर कारवाई
पुणे : वाहतुकीला अडथळा ठरणाºया अशा साधारण ५५ ठिकाणाचे अतिक्रमण काढणे, रस्त्यावर सुमारे ५० ठिकाणी पडलेले मोठे खड्डे आणि पावसामुळे सातत्याने बंद पडणाºया २४ सिग्नलची तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय वाहतूक पोलीस आणि पुणे महापालिकेच्या समन्वय बैठकीत घेण्यात आला़
पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालयात शनिवारी वाहतूक समस्या सोडविण्याबाबत समन्वय समितीची बैठक घेण्यात आली़ वाहतूक पोलिसांच्या वतीने दीर्घकालीन व अल्पकालीन उपाय योजनांची माहिती देण्यात आली़ त्यात अतिक्रमणामुळे बॉटल नेक्स होणाºया सुमारे ५५ ठिकाणांची यादी देण्यात आली़ तसेच पाऊस सुरू होताच शहरातील सुमारे २४ सिग्नल बंद पडतात़ त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करून पुन्हा बंद पडणार नाही, यासाठी करायच्या उपायांची चर्चा झाली़ सिग्नल सिंक्रोनायझेशन केल्यास वाहतूककोंडी कमी होऊ शकते़ त्यावर उपाययोजना करण्यास सांगण्यात आले़
शहरातील अनेक ठिकाणचे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे पुसट झाले आहेत़ ते पुन्हा रंगविण्यात यावेत, अशा सूचना करण्यात आला़ या बैठकीस अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त शीतल उगले, पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, विशेष शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे, वाहतूक शाखेच्या उपायुक्त तेजस्वी सातपुते तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी, महापालिकेचे सर्व विभागप्रमुख व सर्व वॉर्ड अधिकारी उपस्थित होते़
रस्त्यांवर तब्बल १५० बंद पडलेल्या गाड्या
शहरात रस्त्यावर विविध ठिकाणी १५० गाड्या बंद पडल्या आहेत़ त्या उचलण्याची कारवाई तातडीने करण्यात येणार आहे़ महत्त्वाच्या रस्त्यांवर ५० ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत़ ते तातडीने बुजविण्यात येतील़. पीएमपीच्या बसगाड्या अनेकदा उजव्या बाजूने जातात़ त्यांनी डाव्या बाजूने बस चालविण्याच्या सूचना द्याव्यात, असे सांगण्यात आले़