‘सिग्नल यंत्रणा’ केवळ शोभेची वस्तू
By admin | Published: January 10, 2017 02:12 AM2017-01-10T02:12:08+5:302017-01-10T02:12:08+5:30
वाढलेली वाहने, पार्किंगचा प्रश्न, सतत होणारी वाहतुकीची कोंडी याने बारामती शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच लाखो रुपये खर्च करून
बारामती : वाढलेली वाहने, पार्किंगचा प्रश्न, सतत होणारी वाहतुकीची कोंडी याने बारामती शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच लाखो रुपये खर्च करून शहरातील सर्वच चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, हे वाहतूक नियंत्रक दिवे केवळ शोभेची वस्तू झाली आहे.
बारामती शहरात लाखो रुपये खर्च करून उभारलेली वाहतूक नियंत्रक दिवे यंत्रणा बंद आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक खोळंबण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून वाहतुकीच्या समस्या वाढल्या आहेत. विशेषत: चौकात रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांची कसरत होत आहे. वाहतुकीची समस्या सोडवा, अशी मागणी नागरिकांची आहे.
बारामती शहराचा विस्तार वाढत आहे. वाढीव हद्दीत योग्य नियोजन होऊ शकते; परंतु जुन्या हद्दीतील बाजारपेठांमध्ये व्यापार संकुल उभारताना वाहनतळासाठी जागा ठेवणे सक्तीचे करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
सौरऊर्जेवर आधारित वाहतूक नियंत्रक दिवे इंदापूर चौकातउभारले आहेत. त्यासाठी ४० लाख रुपये खर्च करण्यात आला होता. त्यापूर्वी भिगवण चौक, पेन्सील चौक या ठिकाणी वाहतूक नियंत्रक दिवे बसविले. त्यानंतर याच वर्षी शहरातील जवळपास सर्वच चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे बसवण्यात आले आहेत. त्या दिव्यांचे उद्घाटन केल्यापासून एकाही वाहनाला नियंत्रण केले नाही.
याशिवाय तीन हत्ती चौक, पंचायत समिती अशोकनगर, एमआयडीसी चौकांतदेखील वाहतूक नियंत्रक दिवे बसविले आहेत. हे दिवे केवळ शोभेचे असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. हे दिवे सुरू नसल्याने वाहनांवर, वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण होत नसल्याचे चित्र आहे. बारामती शहराचा विस्तार होत असताना जुन्या हद्दीतील मुख्य बाजारपेठांमधील वाहतुकीचा प्रश्न कायमच राहील.
शहरातील सर्वच रस्त्यांवर दुतर्फा वाहने लावली जातात. मध्यंतरी पोलिसांनी रिक्षा भोंगा लावून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला; मात्र नंतर जैसे थे स्थिती आहे. शहरातील शाळा सुटल्यानंतर बाहेर
पडलेले विद्यार्थी, सायकलवर जाणारे विद्यार्थी तसेच वाहनचालकांची भिगवण चौकात मोठी गर्दी होते. त्यातच वाहतूक नियंत्रक दिवे बंद असल्याने नियंत्रण नसलेले वाहनचालक पुढे जाण्याच्या शर्यतीमधून वाहने चालवितात. या वेळी विद्यार्थी, पादचारी यांना अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या चौकासह इंदापूर चौकात (अहिल्यादेवी चौक)देखील हेच चित्र आहे. बस स्थानकापासून जवळ असल्याने या चौकात कायम गर्दी असते. विशेषत: आठवडेबाजाराच्या दिवशी वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते.
एमआयडीसी चौकामध्ये कामगारवर्ग सुटल्यानंतर तसेच शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. त्या वेळी भरचौकात एकच गर्दी होते. या वेळी वाहतूक ठप्प होण्याची वेळ येते. त्यातून अपघात होण्याची भीती व्यक्त होते.
काही वर्षांपूर्वी एका शालेय विद्यार्थिनीचा वाहतूक नियंत्रक दिवे बंद असल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाला जाग येऊन वाहतूक नियंत्रक दिवे तत्काळ सुरू झाले होते. मात्र, काही दिवसांनंतर हे वाहतूक नियंत्रक दिवे बंद झाले. त्यामुळे सध्या परिस्थिती ‘जैसे थे ’ आहे.
(वार्ताहर)
व्यापार संकुलामध्ये वाहनतळ सक्तीचा करा.
४वाहतूक नियंत्रक दिवे बंद असल्याने वाहनचालकांवर नियंत्रण नसते. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असते. पादचारीदेखील वाहनांमध्ये घुसून वाट काढत असतात. यामध्ये शालेय विद्यार्थी, ज्येष्ठांचादेखील समावेश असतो. अनेकदा यातून अपघात होतात.
४हे अपघात किरकोळ स्वरूपाचे असले, तरी त्यातून वाद होतात. तर, अनेकदा वाहतुकीची कोंडी होते, असे येथील एका व्यावसायिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. बाजारपेठांमध्ये नव्याने व्यापारी संकुल उभारले जातात त्यांना वाहनतळ सक्तीचा करावा.
४वाहतुकीच्या कोंडीतून बारामतीकरांना सोडवावे, अशी मागणी आहे. वाहनतळाच्या जागेवरदेखील व्यापारी गाळे काढून विकले जातात; त्यामुळे वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न कायम राहतो.
वाहतूककोंडीतून सुटका करा...
४भिगवण चौक, तीन हत्ती चौकात दुचाकी, चारचाकी गाड्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. या गाड्या अस्ताव्यस्त लावलेल्या असतात. तीन हत्ती चौकातदेखील सिग्नल उभारण्यात आले आहेत. त्याचा अद्याप वापर केलेला नाही.
४चौकातील सिग्नल सुरू कधी होणार, हा सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. मुख्य मार्गावरून ‘केजी टू पीजी’पर्यंतचे विद्यार्थी पायी, दुचाकी, सायकलचा वापर करीत शाळा-महाविद्यालय गाठतात. त्यांना या वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो.
४तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाकडे नीरा डावा कालव्याच्या बाजूच्या रस्त्याने जाताना दोन्ही बाजूंच्या गाड्यांमुळे जीव मुठीत धरूनच विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडावा लागतो.
चौकाचौकांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण
४बारामती शहरातील कारभारी सर्कल, गुणवडी चौक, इंदापूर चौक, भिगवण चौक, तीन हत्ती चौक, कदम चौक, महात्मा फुले चौक (खंडोबानगर), पेन्सिल चौक, सुभाष चौक, महात्मा गांधी चौक आदी चौकांमध्ये अत्यंत घाईत सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली. त्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर मात्र वाहतूक नियंत्रक दिवे बंदच आहेत.
४मनुष्यबळ उपलब्ध नसताना सिग्नल यंत्रणा कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला. शहरातील इंदापूर चौकातील सौरऊर्जेवरील सिग्नल यंत्रणा तर पुन्हा खर्चिक झाली आहे. त्या वेळच्या ठेकेदाराने देखभाल-दुरुस्ती सोडूनच दिली.
४सौरऊर्जा साठविण्याच्या पेट्या चोरीला गेल्या आहेत. अगदी चौकातच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असते. त्यामुळे आठवडेबाजार, सणाच्या दिवशी वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढताना अनेक अडचणी येतात.
पोलीस कर्मचारी वाढविणार : विजय जाधव
४नगरपालिकेची निवडणूक नुकतीच झाली आहे. सध्या शहर पोलीस ठाण्याकडे ७ वॉर्डन, ११ पोलीस कर्मचारी आहेत.
४वाहतूक नियंत्रक दिवे सुरू झाल्यावर आणखी ५ वाहतूक पोलीस कर्मचारी वाढविण्यात येतील, असे ‘लोकमत’शी बोलताना पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी सांगितले.