कोठारी ब्लॉक चौकात दोन महिन्यांपासून सिग्नल बंद : अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 02:16 AM2018-10-01T02:16:24+5:302018-10-01T02:16:41+5:30
बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील कोठारी ब्लॉक चौकातील स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या उजव्या बाजूची दिशा दर्शविणारा सिग्नल दोन महिन्यांपासून बंद आहे.
बिबवेवाडी : बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील कोठारी ब्लॉक चौकातील स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या उजव्या बाजूची दिशा दर्शविणारा सिग्नल दोन महिन्यांपासून बंद आहे. परंतु, बंद पडलेल्या या सिग्नलची साधी दखलही वाहतूक पोलिसांकडून घेतली जात नाही. कोठारी ब्लॉक चौकातील या सिग्नलमुळे सरळ स्वारगेटच्या दिशेने जाता येते व डाव्या बाजूला सातारा रोडवर जाता येते, तसेच उजव्या बाजूने मेघस्पर्शसारख्या मोठ्या गृह प्रकल्पाबरोबरच छोटी अपार्टमेंटस, प्रसिद्ध जैन स्थानकाकडे व सह्याद्री हॉस्पिटलकडे जाता येते.
या चौकातील उजव्या बाजूच्या दिशेने जाणाºया नागरिकांना सिग्नल बंद असल्यामुळे आपली वाहने रामभरोसे चालवावी लागत आहेत. परंतु, पुष्प मंगल चौकातून येणारी वाहने या चौकातील सिग्नल न पाळता गाडी वेगाने चालवतात, त्यामुळे इथे अपघात होण्याची शक्यता आहे. बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद रस्त्यावर सध्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने चालू आहे. त्याचा एक टप्पा म्हणून कोठारी ब्लॉक चौकापर्यंत काम चालू आहे. त्यामुळे वाहने चालवण्यासाठी अर्धाच रस्ता उपलब्ध असतो. अशा परिस्थितीत या चौकात स्वारगेटच्या दिशेने जाण्यासाठी रोजच ट्रॅफिक जॅम होत असते. उजव्या बाजूला जाणारा सिग्नल बंद असला, तरी वाहने उजव्या बाजूला जाण्यासाठी सिग्नल सुटण्याची वाट बघत थांबतात.