पुणे शहरातील सिग्नल सिंक्रोनाईज होणे आवश्यक : डॉ. के. व्यंकटेशम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 05:48 PM2020-09-19T17:48:23+5:302020-09-19T17:50:13+5:30
डॉ. व्यंकटेशम यांची अपर पोलीस महासंचालक विशेष अभियानपदी बदली झाली आहे.
पुणे : शहरात सध्या एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ ही मोठी समस्या आहे. त्यासाठी शहरातील सिग्नल सिंक्रोनाईज होणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीने हे काम हाती घेतले आहे. ते पूर्ण झाल्यावर लोकांचा प्रवासातील वेळ कमी होऊ शकेल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी व्यक्त केले.
डॉ. व्यंकटेशम यांची अपर पोलीस महासंचालक विशेष अभियानपदी बदली झाली आहे. त्यानिमित्त त्यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पुण्यातील आपल्या २ वर्षाच्या कार्यकाळाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आपण तीन मुद्देसमोर ठेवून काम केले. हट्टी आशावाद, विपुलतेची मानसिकता आणि निरंतर सहकार्याची भावना घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला हे खात्याअंतर्गत राबविले. त्याचा परिणाम चांगला होऊन सर्वांची कामाकडे पाहण्याची मानसिकता बदलण्यास सहाय्यभूत ठरले. अधिकार्यांप्रमाणेच सर्व पोलीस कर्मचार्यांना भावनिक प्रज्ञावंत हे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यातून पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत झाली.
लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामांपैकी ९० टक्के कामे ही पोलिसांची नव्हती. त्यावेळी एका पोलीस कर्मचार्याने सांगितले की, ‘‘आता नाही करायचे तर कधी करायचे़’’ त्यातूनच कोरोना काळात पोलिसांनी सर्व बाबी बाजूला ठेवून कायद्याची अंमलबजावणी केली.
शहरातील प्रत्येक प्राणघातक अपघाताचा वरिष्ठ पातळीवर अभ्यास करण्यात आला. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या बाबींतील दोष दूर करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यासाठी सातत्याने महापालिकेशी अधिकारी समन्वय साधत असतात. आता प्रत्येकाचा काम करण्याचा वेग वेगवेगळा असतो, असे त्यांनी सांगितले.
पुण्यात सुरु केलेले ‘सेवा अॅप’, तसेच तडीपार गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी ‘एक्सट्रा अॅप’ आता राज्यभर राबविला जाणार आहे. राज्यभरातून पुण्यात शिक्षणासाठी येणार्या पोलीस अधिकारी, कर्मचार्यांच्या मुलामुलींसाठी वसतीगृहाची सोय करण्यात आली. पोलिसांसाठी ५ इमारतींपैकी २ इमारतींचे काम लवकरच पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे उपस्थित होते.
......
पुणेकरांमुळे मराठी सुधारली
समाज माध्यमात मेसेज टाकल्यावर अनेक जण त्याचा प्रतिसाद देतात. त्याचबरोबर तुमच्या चुकाही दाखवितात. तुमची ही वेलांटी चुकली, ती अशी पाहिजे होती, असे सांगतात. त्याचबरोबर एखादी चुक झाली असली तरी त्यामागील प्रामाणिकतेची भावना पुणेकर जाणतात. चुक दुरुस्ती केल्यावर मोठ्या मनाने स्तुतीही करतात.
इतर शहरात ११ सुचना येत होत्या. पुण्यात पहिल्यावेळीच तब्बल ८११ सुचना आल्या होत्या. पुणेकरांच्या प्रतिसादामुळे काम करायला हुरुप आला. पुणेकरांमुळे माझी मराठी सुधारली, असे डॉ. व्यंकटेशम यांनी सांगितले.